'गौतमी पाटीलची लावणी अन् पुन्हा...', पोलिसांच्या मध्यस्थीमुळे कार्यक्रम अर्ध्यातच थांबला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:15 AM2023-03-22T11:15:05+5:302023-03-22T11:16:08+5:30
गहुंजे गावातील एका यात्रेनिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
सध्या गावागावात डान्सर गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावणीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते. गौतमीची लावणी बघण्यासाठी जागाही पुरत नाही इतके लोक येतात आणि कार्यक्रमात राडा होतो. गौतमीचा डान्स, तिचे हावभाव नेहमीच चर्चेत असतात. याआधी अश्लील नृत्य केल्याने तिच्यावर टीका होत होती. यानंतर तिने माफी मागितली. आता मात्र तिचे कार्यक्रम तुफान गाजतात. पण गौतमीचा कार्यक्रम आणि काही राडा होणार नाही असं तर शक्यच नाही.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेलगत असलेल्या गहुंजे गावातील एका यात्रेनिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अपेक्षेप्रमाणे कार्यक्रमाला ग्रामस्थांनी तुफान गर्दी केली. गौतमीला १ लाख वीस हजाराची सुपारीही दिल्याची माहिती मिळत आहे. गौतमीची एंट्री होताच लोक बेधुंद होऊन नाचू लागले. तिच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी पूर्वतयारी केली होती. हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी खुर्च्याच दिल्या नाहीत. तर उलट त्यांना खाली जमिनीवर बसवले. मात्र तरी मद्यधुंद अवस्थेतील काही तरुण भान हरपून नाचले. यामुळे काही राडा होण्याच्या आतच पोलिसांनी कार्यक्रम थांबवला.
गौतमी पाटीलचा सुरु असलेला कार्यक्रम असा मध्येच बंद पाडल्याने ग्रामस्थांचाही हिरमोड झाला. मात्र पोलिसांच्या सावधगिरीमुळे कोणता राडा झाला नाही. तर कार्यक्रमाची परवानगी तरी पोलिसांनी का दिली याबाबत आता गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. याआधीही एकदा गौतमीला कार्यक्रम मध्यातच सोडून जावं लागलं होतं आणि आता पुन्हा तिचे कार्यक्रम थांबवावे लागत असल्याने तिचीही डोकेदुखी वाढली आहे.