Nattu Kaka Funeral: बाघाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली नट्टू काकांची लेक; घनश्याम नायक अनंतात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 12:16 PM2021-10-04T12:16:37+5:302021-10-04T12:17:43+5:30
Nattu Kaka Funeral: लाडक्या ‘नट्टू काकां’ना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचली ‘Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’ची टीम, पाहा फोटो…
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील नट्टू काका (Nattu Kaka) अर्थात अभिनेते घनश्याम नायक (Ghanshyam Nayak Demise) यांनी काल अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 77 वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. घनश्याम नायक दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची अख्खी टीम शोकाकुल आहे. घनश्याम नायक यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची अख्खी टीम यावेळी हजर होती. याचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Nattu Kaka Ghanshyam Nayak Funeral)
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची टीम आपल्या लाडक्या नट्टू काकांना अंतिम निरोप द्यायला पोहोचली. यावेळी बाघा अर्थात अभिनेता तन्मय वकेरिया घनश्याम यांच्या मुलीचे सांत्वन करताना दिसला.
घनश्याम यांची लेक बाघाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. हे दृश्य पाहून प्रत्येकजण गहिरवला. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे कलाकार दिलीप जोशी, निर्माते असित मोदी, टप्पूची भूमिका साकारणारे दोन्ही भव्य गांधी व राज अनादकत, बबीताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता, भिडे मास्तर अर्थात मंदार चंदावरकर, अय्यर भाईची भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे अशा सर्व कलाकारांनी नट्टू काकांना अंतिम निरोप दिला. यावेळी सगळेच जण भावुक दिसले.
जेठालाल अर्थात दिलीप जोशी याच्यांशी नट्टू काका यांचे खास जमायचे. मालिकेत दिलीप जोशी नट्टू काकांचे मालक होते. पण पडद्यामागे दोघांचंही खास नातं होतं. नट्टू काकांच्या जाण्याने दिलीप जोशी भावुक दिसले.
गेल्या काही महिन्यांपासून नट्टू काका अर्थात घनश्याम नायक ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दिसत नव्हते. लॉकडाऊननंतर अचानक त्यांनी मालिकेतून एक्झिट घेतली होती. यानंतर नट्टू काकांना कॅन्सरने गाठल्याची बातमी समोर आली होती.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या घशाचं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या घशातून कॅन्सरच्या 8 गाठी काढण्यात आल्या होत्या. यानंतर नट्टू काका बरे होऊन मालिकेत परतील, अशी आशा चाहत्यांना होती. पण ती आशा फोल ठरली. कालांतराने नट्टू काकांची प्रकृती आणखी बिघडत गेली आणि आज त्यांनी या जगातूनच कायमची एक्झिट घेतली. आता नट्टू काका मालिकेत कधीच परतणार नाहीत.
नट्टू काका उर्फ घनश्याम नायक यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचे आहे. मी जिवंत आहे, तोपर्यंत मी काम करत राहिल. चेह-यावर मेकअप लागलेला असतानाच मला मरण यावे, अशी माझी शेवटची इच्छा आहे, असे ते म्हणाले होते.