'व्हॅलेंटाईन डे'लाच 'गुम है किसी के प्यार में' फेम हर्षद अरोराने उरकला साखरपुडा; कोण आहे होणारी बायको?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 13:41 IST2024-02-15T13:41:13+5:302024-02-15T13:41:56+5:30
हर्षद अरोराने त्याच्या चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे.

'व्हॅलेंटाईन डे'लाच 'गुम है किसी के प्यार में' फेम हर्षद अरोराने उरकला साखरपुडा
सध्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजनमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकापाठोपाठ एक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. आता लोकप्रिय अभिनेता हर्षद अरोरा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 'बेइंताहा' मधून करिअरची सुरुवात करणारा अभिनेता हर्षद अरोरा हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध स्टार आहे. हर्षद अरोराने त्याच्या चाहत्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे.
अभिनेत्यानं नुकतेच गर्लफ्रेंड मुस्कान राजपूतसोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत दोघांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी हर्षद अरोरा आणि त्याची गर्लफ्रेंड मुस्कान राजपूत यांनी सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, 'एकत्र पुढचं पाऊल टाकत आहोत...एंगेज्ड'. हर्षद अरोराची होणारी बायको मुस्कान राजपूत देखील टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे. मुस्कानने नागिन 6 मध्ये विदुषीची भूमिका साकारली होती. हर्षद अरोराच्या या पोस्टवर केवळ सेलिब्रिटीच नाही तर त्याचे चाहतेही त्याचे अभिनंदन करत आहेत.
मुस्कानच्या आधी हर्षद 'नागिन 4' मालिकेतील अभिनेत्री अपर्णा कुमारसोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांनी 2018 मध्ये एका मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेत अपर्णाने हर्षदच्या आईची भूमिका साकारली होती. येथेच दोघांची भेट झाली होती. पण, काही काळाने त्यांचं ब्रेकअप झालं. हर्षदच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 'गम है किसी के प्यार में' मध्ये डॉक्टर सत्याची भूमिका साकारताना दिसला होता. या शोमध्ये त्याची आणि आयशा सिंगची जोडी लोकांना खूप आवडली होती.