Gokulashtami 2018 :मुहूर्त साधत सुमेध मुदगलकरचा कृष्ण अवतार आला समोर,या पौराणिक मालिकेत साकारणार मुख्य भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:42 PM2018-09-03T13:42:09+5:302018-09-03T13:43:51+5:30
सुमेध मुदगलकरचा कृष्ण अवतार सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या या फोटोवर खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वत्रच दही हंडी जल्लोषात साजरी होत आहे.या खास दिवसाचे औचित्य साधत 'राधाकृष्ण' या पौराणिक मालिकेतला सुमेध मुदगुलकरचा कृष्ण अवतार रिव्हील करण्यात आला आहे. सुमेधचा कृष्ण अवतार सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या या फोटोवर खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नेहमीच पौराणिक मालिकेला रसिकांचे प्रचंड प्रेम मिळत आले आहे. पौराणिक मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा रसिकांना प्रचंड आवडत असतात. त्यामुळेच पुन्हा एकदा डॅशिंग सुमेध मुदगलकर कृष्णा बनत रसिकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारायला मिळाल्यामुळे सुमेध सध्या खूपच खूश आहे.या मालिकेतील कृष्णाची भूमिका महत्त्वाची असल्याने या भूमिकेसाठी अनेक कलाकारांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. अनेक कलाकारांचे ऑडीशन घेतल्यानंतर या भूमिकेसाठी सुमेधच योग्य वाटत असल्यामुळे त्याची या मालिकेसाठी निवड करण्यात आली.
इतर पौराणिक मालिकांप्रमाणे राधाकृष्ण मालिकाही छोट्या पडद्यावरील रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त करण्यात यशस्वी ठरेल. आकर्षक सेट्स, एनिमेशन इफेक्ट आणि कलाकारांचा कसदार अभिनय यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरेल. योग्यरीतीने विषय मांडल्यास आजच्या युगातही पौराणिक मालिका पसंत केल्या जाऊ शकतात असेच मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे.
सिध्दार्थकुमार तिवारी यांची ‘राधाकृष्ण’ ही आगामी मालिका भव्यता, श्रीमंती थाट आणि उच्च निर्मितीमूल्यांसाठी ओळखली जाईल. तिची निर्मिती अतिशय मोठ्या स्तरावर केली जात आहे. ही एक संगीत मालिका असून त्यात रासलीलेच्या विविध भावना व्यक्त करताना नृत्य आणि संगीताचा वापर केला जाणार आहे. अशा स्थितीत रासलीलेच्या एका नृत्यप्रसंगासाठी तब्बल दोन हजार मराठी ज्युनिअर कलाकारांची भरती करण्यात आल्याचे सांगितले जाते.
या मालिकेच्या प्रसंगांच्या केंद्रस्थानी नायक-नायिकाच असले, तरी त्यांच्या पार्श्वभूमीवर शेकडो नर्तक नृत्य करताना दिसतात. तीच गोष्ट अॅक्शन प्रसंगांची. टीव्ही मालिकेत आपल्याला छोटी का होईना, भूमिका मिळावी आणि आपला चेहरा टीव्हीच्या पडद्यावर दिसावा, यासाठी प्रयत्न करणा-या हजारो कनिष्ठ कलाकारांना या मालिकेमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. ही मालिका खरोखरच अतिशय भव्य प्रमाणावर तयार केली जात असून तिच्या निर्मितीत असंख्य लोकांचा हातभार लागत आहे. या मालिकेचे सेट गुजरातच्या सीमेजवळील उंबरगावमध्ये उभारण्यात आले असून या नृत्यप्रसंगाचे चित्रीकरण पूर्ण होईपर्यंत या कलाकारांना तिथेच मुक्काम करण्यास सांगण्यात आले आहे.