"तो माझा कोणीच लागत नाही...", कृष्णा अभिषेकबद्दल असं का म्हणाली गोविंदाची पत्नी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:53 IST2025-01-07T12:53:09+5:302025-01-07T12:53:54+5:30
मामा-भाच्याचं भांडण मिटलं तरी...

"तो माझा कोणीच लागत नाही...", कृष्णा अभिषेकबद्दल असं का म्हणाली गोविंदाची पत्नी?
कॉमेडियन कृष्णा अभिषेकचं (Krishna Abhishek) मामा गोविंदासोबतचं (Govinda) भांडण काही दिवसांपूर्वीच मिटलं. गोविंदाच्या पायाला गोळी लागली तेव्हा कृष्णा अभिषेकची पत्नी हॉस्पिटलमध्ये गेली होती. कृष्णा तेव्हा परदेशात होता. मात्र भारतात आल्यानंतर त्याने गोविंदाच्या घरी जात त्याची भेट घेतली. तब्बल ७ वर्षांनंतर तो मामाच्या घरी गेला. दरम्यान तेव्हा गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा मात्र हजर नव्हत्या. तसंच गोविंदासोबत कृष्णाचं भांडण मिटलं असलं तर सुनिता अजूनही नाराजच असल्याच्या चर्चा होत्या. यावर सुनिता आहुजा यांनी स्वत:च खुलासा केला आहे.
'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत सुनिता आहुजा म्हणाल्या, "मामा आणि भाच्यातील भांडण मिटलं याचा मला आनंद आहे. पण माझा याच्याशी काहीच संबंध नाही. ते त्या दोघांचं नातं आहे. कृष्णा माझा कोणी लागत नाही. हा पण मी गोविंदाला कधीच त्याने त्याच्या कुटुंबाशी बोलू नये असं सांगितलं नाही. कृष्णा गोविंदाच्या बहिणीचा मुलगा आहे, कुटुंबाचाच भाग आहे. मी यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही."
सुनिता आहुजा यांनी याआधीही कृ्ष्णाबद्दल अशाच प्रकारे भाष्य केलं होतं. तसंच भांडण मिटल्यानंतर गोविंदाने कपिल शर्मा शोमध्येही हजेरी लावली. यावेळी कृष्णा अभिषेकने गोविंदासमोर कॉमेडी केली. मात्र यावेळी गोविंदासोबत पत्नी आली नाही. त्यामुळे सुनिता आहुजा आणि कृष्णा यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.