हिरवी साडी, कपाळावर हळद कुंकू अन् गळ्यात मंगळसूत्र, 'गाथा नवनाथांची'मधील मिलिंद शिंदेंचा लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 12:15 PM2023-11-01T12:15:34+5:302023-11-01T12:16:02+5:30
Gatha Navnathachi : 'गाथा नवनाथांची' मालिकेत सध्या घमासान युद्ध परिस्थिती रंगली आहे. हे युद्ध बाल नागनाथ आणि गुरुआई यांमध्ये घडताना दिसत आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील 'गाथा नवनाथांची' (Gatha Navnathanchi) मालिका अनेक यशस्वी भागांनंतरही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अलीकडेच बाल नागनाथांच्या भूमिकेत आरूष बेडेकरचा कमाल अभिनय प्रेक्षक अनुभवत आहेत. त्यातच आता बाल नागनाथांना काटशह देण्यासाठी गुरुआईचा प्रवेश गावात झालेला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे गुरुआई या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे पाहायला मिळणार आहेत.
'गाथा नवनाथांची' मालिकेत सध्या घमासान युद्ध परिस्थिती रंगली आहे. हे युद्ध बाल नागनाथ आणि गुरुआई यांमध्ये घडताना दिसत आहे. बाल नागनाथांनी गावाचे रक्षण तसेच उद्धार करण्याचा विडा उचललेला आहे. पण बाल नागनाथांचे समाजकार्य आणि गावकऱ्यांच्या मनामधील त्यांच्याविषयीची वाढत जाणारी आस्था, आपुलकी गावातील पाटलांच्या नजरेत खुपते आहे. बाल नागनाथांचा बंदोबस्त करण्यासाठी पाटील गुरुआईला बोलावणं धाडतात, पण बाल नागनाथ गुरुआईचा प्रत्येक वार निकामी करताना दिसताहेत. पाटलांच्या सांगण्यावरून षडयंत्र रचणारे गुरुआई हे पात्र मिलिंद शिंदे यांनी साकारले आहे. बाल नागनाथ म्हणजेच आरूष बेडेकर आणि गुरुआई म्हणजेच अर्थात मिलिंद शिंदे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं रंजक ठरणार आहे.
मिलिंद शिंदेनी आजवर अनेक भूमिका गाजवल्या आहेत, पण सध्या या मालिकेत त्यांनी साकारलेली गुरुआई ही भूमिका आणि त्यांनी या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत उल्लेखनीय आहे. अंगावर हिरवीकंच साडी.. डोक्यावर पदर.. कपाळावर हळद कुंकवाचा भला मोठा टिळा आणि गळ्यात घातलेलं डोरलं.. नेमकं यातून काय निर्देशित करण्याचा प्रयत्न आहे, हे रहस्य लवकरच उलगडणार आहे. गुरुआई केवळ पाटलांच्या सांगण्यावरून बाल नागनाथांच्या मार्गात अडथळे घालतेय की आणखीसुद्धा काही रहस्ये त्यामागे दडली आहेत, यांचा उलगडा लवकरच होणार आहे.