'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने पत्नीसोबत साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, शेअर केले फोटो
By कोमल खांबे | Updated: March 30, 2025 08:09 IST2025-03-30T08:08:41+5:302025-03-30T08:09:22+5:30
यंदा अनेक सेलिब्रिटी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत. 'बिग बॉस मराठी' फेम निखिल राजेशिर्के यानेदेखील पत्नीसोबत लग्नानंतरचा हा पहिला गुढीपाडवा साजरा केला आहे.

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने पत्नीसोबत साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, शेअर केले फोटो
आज संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारुन गुढीपाडवा साजरा केला जातो. मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. ठिकठिकाणी शोभायात्राही काढल्या जातात. दरवर्षी अनेक सेलिब्रिटीही घरोघरी गुढी उभारुन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदा अनेक सेलिब्रिटी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत. बिग बॉस मराठी फेम निखिल राजेशिर्के यानेदेखील पत्नीसोबत लग्नानंतरचा हा पहिला गुढीपाडवा साजरा केला आहे.
निखिलने सकाळीच घरी गुढी उभारत त्याचे पूजन केले. हार, फुले वाहून सर्वांच्या मंगल आरोग्यासाठी आणि भवितव्यासाठी प्रार्थना केली. पत्नीबरोबरच फोटो निखिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "सुखाची गुढी, आनंदाचा कळस! नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद, भरभराट आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
निखिलने गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर साखरपुडा केला होता. तर गेल्या वर्षीच नोव्हेंबर महिन्यात तो लग्नाच्या बेडीत अडकला. त्याच्या पत्नीचं नाव चैत्राली मोरे असं आहे. निखिलने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. टीव्हीवरील तो लोकप्रिय चेहरा आहे. 'छोटी मालकीण', 'रंग माझा वेगळा', 'असेही एकदा व्हावे', 'अजूनही बरसात आहे', 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्याने 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभाग घेतला होता. निखिलने अनेक सिनेमांतही काम केलं आहे.