"आपली लेक पण कुठेतरी सून आहे, हे सासूबाईंनी...", हर्षदा खानविलकर स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 07:53 PM2024-02-01T19:53:08+5:302024-02-01T19:54:27+5:30
"सासू-सुनेने आई आणि मुलगी होण्याची गरज नाही", सासूसुनेच्या नात्याबद्दल असं का म्हणाल्या हर्षदा खानविलकर?
टीव्ही जगतातील सासूबाई म्हटलं की हर्षदा खानविलकर डोळ्यासमोर येतात. प्रेमळ, मायाळू, कणखर, कडक शिस्तीची सासूबाई हर्षदा यांनी पडद्यावर साकारली. मग 'पुढचं पाऊल'मधली राजलक्ष्मी असो किंवा 'रंग माझा वेगळा' मालिकेतील सौंदर्या इनामदार. सासूबाईची भूमिका हर्षदा यांनी एकदम चोखपणे साकारली. केवळ भूमिकाच नव्हे तर सासूबाई या व्यक्तिरेखेचे पैलूही त्यांनी अभिनयातून दाखवले. सध्या हर्षदा 'मुलगी पसंत आहे' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
हर्षदा खानविलकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सासू-सुनेच्या नात्यावर भाष्य केलं. रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत त्यांना "सुरुवातीपासून सासूबाईंनी कसं वागायला हवं, जेणेकरून पुढचं सगळं सोपं होईल?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत त्या म्हणाल्या, "पूर्वी आई मुलींना सांगून पाठवायची की सासूला आईच समज. सासूबाईंचंही म्हणणं असायचं की तू माझ्या मुलीसारखीच आहेस. पण हे सगळं कशाला? आई आहे मला. त्यामुळे तुम्ही ग्रेट सासू व्हायचा प्रयत्न करा. सासूला आई म्हणण्याची गरज नाही. कारण, घरी एक आई आहे. ही तुझ्या नवऱ्याची आई आहे. तो मान तिला योग्य पद्धतीने देता आला पाहिजे. आपण ज्याच्यावर प्रेम करून किंवा ज्याच्यासाठी या घरात आलो आहोत. त्याच्यासाठी ही महत्त्वाची बाई आहे. त्यामुळे तिला जेवढं स्पेशल फिल करवून देता येईल तेवढं तू कर. या गोष्टीचा विचार घरातल्या आईने केला पाहिजे. आपला मुलगा त्याचं संपूर्ण आयुष्य जिच्याबरोबर काढणार आहे. तिला असं वागवूया की जेव्हा मी नसेल तेव्हा ती आपल्या मुलाला राजासारखी वागणूक देईल."
"कुठल्याही सासूसुनेने एकमेकींची आई-मुलगी होण्याची गरज नाही. ते आपापल्या घरी असतंच. जे नातं आपण घेऊन आलो आहोत. त्या नात्यात खरेपणा आणला पाहिजे. सासूने ग्रेट सासू बनण्याचा प्रयत्न करूया. आणि सुनेने ग्रेट सून बनण्याचा प्रयत्न करुया. आपल्या नवऱ्याची आई ही आपली सासूच आहे. तिला तिचा तो मान देऊया. आणि सासूबाईंनी लक्षात ठेवावं की आपली लेक कुठेतरी दुसरीकडे सून म्हणून आहे. ही आपली सून आहे. तिला तिचा मान देऊन सुनेसारखं वागवूया. ही क्लॅरिटी आली तर अर्धे प्रश्न तिथेच सुटतील, असं मला वाटतं," असंही त्यांनी सांगितलं.