पासपोर्ट, पर्स अन् दहा लाखाच्या मौल्यवान वस्तू चोरीला, नवऱ्यासह परदेशातच अडकली अभिनेत्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 02:40 PM2024-07-11T14:40:09+5:302024-07-11T14:43:00+5:30
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय कपल आहे.
Divyanka Tripathi : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय कपल आहे. या दोघांमध्ये जबरदस्त अशी बॉन्डिंग पाहायला मिळते. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट तसेच व्हिडिओज शेअर करत हे कपल चर्चेत येत असतं.
सध्या दिव्यांका त्रिपाठी आपल्या पतीसोबत परदेशात ट्रिपवर गेली आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण इटलीमध्ये या दोघांना एक वाईट अनुभव आला आहे. खरंतर, दिव्यांका आणि विवेक त्यांच्या लग्नाच्या ८व्या वाढदिवसानिमित्त परदेशात ट्रिपसाठी गेले होते. तिथे त्यांनी चांगल्या पद्धतीने एकत्र वेळ घालवला. पण तिथे या कपलसोबत एक विचित्र घटना घडली आहे. या ट्रिपमध्ये त्यांचा पासपोर्ट, पर्स आणि १० लाख रूपये अशा मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या. आता दिव्यांका पती विवेकसह इटलीत अडकली आहे.
सदर घटनेची माहिती 'ई टाईम्सला' देत विवेक दहिया म्हणाला, "आम्ही काल फ्लोरेंसमध्ये पोहचलो. त्यानंतर आम्ही इथे आणखी एक दिवस राहायचं असं ठरवलं. त्यासाठी मी आणि दिव्यांका दोघेही राहायला जागा पाहण्यासाठी गेलो आणि बाहेर कारमध्ये आमचं सामान तसंच ठेवलं. काही वेळानंतर जेव्हा आम्ही बाहेर सामान घेण्यासाठी परतलो तेव्हा आमच्या कारच्या काचा तोडून आमचं सामान कोणीतरी चोरलं होतं. हे सगळं पाहून आम्हाला धक्काच बसला".
या संपूर्ण घटनेनंतर विवेक दहियाने स्थानिक पोलिसांसोबत संपर्क साधला. परंतु काहीच मदत मिळाली नाही. त्यावर विवेक म्हणाला, " घडल्या प्रकारानंतर स्थनिक पोलीस प्रशासनासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी आमची मदत करण्यास टाळाटाळ केली. चोरी झालेल्या ठिकाणी कोणताही सीसीटीव्ही नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असं त्यांच म्हणणं होतं. शिवाय संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पोलीस स्टेशन बंद होतं. त्यामुळे ते कोणतीही मदत करू शकणार नाही असं ते म्हणाले. याव्यतिरिक्त आम्ही भारतीय दुतवासाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यांच्यासोबतही संपर्क होऊ शकला नाही".
पुढे विवेक म्हणाला, " फ्लोरेंस जवळ एक छोटसं शहर आहे. सध्या आम्ही तिथे राहतोय. तिथल्या हॉटेल व्यवसयिकांनी आम्हाला खूपच मदत केली. पण आम्हाला दुतवासाच्या मदतीची गरज आहे. भारतात परतण्यासाठी आम्हाला पासपोर्टची गरज आहे आणि हे काम दुतवासाच्या मार्फत होऊ शकतं. शिवाय आमच्याकडे काही पैसेही उरले नाहीत", असं विवेकने सांगितलं.