"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 01:12 PM2024-05-18T13:12:27+5:302024-05-18T13:13:12+5:30
Kiran Mane : ठाण्यात झालेल्या महासभेत भाषण करतानाचा व्हिडीओ किरण मानेंनी शेअर केला आहे. यात त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.
'बिग बॉस मराठी' फेम किरण माने मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. अनेक मालिका आणि नाटकांत काम करून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. आता किरण मानेंनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. किरण माने (Kiran Mane) यांनी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. नुकतेच ठाण्यात झालेल्या महासभेत भाषण करतानाचा व्हिडीओ किरण मानेंनी शेअर केला आहे.
किरण माने यांनी ठाण्यातील महासभेत भाषण करतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार??? ठाण्यात निष्ठावंतांच्या महासभेत बोलताना... किरण माने या भाषणात म्हणाले की, काय तर म्हणे हिंदुत्वासाठी उद्धवजींना सोडलं. कसलं हिंदुत्व? हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन गुवाहाटीला लपून बसणारं नसतं. हिंदुत्व उद्धवजींसारखं संकटावर निधड्या छातीने चाल करून जाणारं असतं. त्यांचा वारसाच प्रबोधनकार ठाकरेंचा आहे. प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व रक्तात घेऊन आलेत ते त्यांना तुम्ही हिंदुत्व शिकवताय?
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा पराभव व्हावा म्हणून शतचंडी यज्ञ करणाऱ्या विचारधारेच्या वळचणीला तुम्ही जाता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता? ज्यांनी तुकारामांची गाथा बुडवली. तुकारामांना वैकुंठाला पाठवलं. त्यांच्या वळचणीला तुम्ही जाता आणि आम्हा हिंदुत्व शिकवता ? ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता ? महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर शेणाचा मारा ज्यांनी केला , दगडगोटे मारले, त्यांच्यावर मारेकरी घातले. त्यांचे पाय धरता तुम्ही आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता ? राजश्री शाहू महाराज एवढ्या लोभस व्यक्तिमत्वावर महिलांविषयी गैरवर्तणूकीचे आरोप केले. या विचारधारेच्या पाठीशी तुम्ही जाताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता ? जगद्गुरू संत तुकोबाराया अशा लोकांसाठी म्हणून गेले होते की, नका दंतकथा येथे सांगो कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. अनुभव येथे पाहिजे साचार. न चलती चार आम्हांपुढे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. येरगबाळाचे काम नोव्हे.