LockDown दरम्यान अग्गंबाई सासुबाईच्या बबड्याचं क्वारंटाईनचं शेड्युल तुम्हाला माहिती आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 03:20 PM2020-04-10T15:20:40+5:302020-04-10T15:24:30+5:30
अग्गंबाई सासूबाई या मालिकेत काम केल्यानंतर सोहमच्या म्हणजेच आशुतोषच्या आयुष्यात अनेक बदल घडले आहेत.
करोना विषाणूचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. हे कलाकार घरी आपल्या वेळ कसा घालवत आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेमुळे घराघरात बबड्या म्हणजेच सोहम या व्यक्तिरेखेची चर्चा असून या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता आशुतोष पत्की याचा एक मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
बबड्या म्हणजेच आशुतोष त्याचा वेळ घरी कसा घालवतो याबद्दल बोलताना तो म्हणाला, "हा २१ दिवसांचा लॉकडाऊन म्हणजे सरकारने आपल्या सेफ्टीसाठी घेतलेला निर्णय आहे त्यामुळे आपण घरी राहून त्यांना सहकार्य करायला पाहिजे. मी घरी माझा वेळ माझ्या घरच्यांसोबत घालवतोय. या मोकळ्या वेळात मी अनेक गोष्टी शिकायचा प्रयत्न करतोय. सध्या मी कूकिंग शिकतोय. वेगवेगळ्या रेसिपीज मी ट्राय करतोय. घरच्यांना त्यांच्या कामात मदत करतोय, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देतोय. या वेळेत आपण अनेक छान वेब-सिरीज किंवा चित्रपट बघू शकतो. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चित्रपट बघतो. हे माझं क्वारंटाईनचं शेड्युअल बनलंय."
अग्गंबाई सासूबाई या मालिकेत काम केल्यानंतर सोहमच्या म्हणजेच आशुतोषच्या आयुष्यात कोणकोणते बदल घडले हे त्याने नुकत्याच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याने या मुलाखतीत सांगितले की, या मालिकेमुळे मला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण या मालिकेत मी साकारत असलेल्या सोहम या व्यक्तिरेखेला काहीशा नकारात्मक छटा आहेत. तो प्रचंड बिघडलेला असून त्याला त्याच्या आईची अजिबातच काळजी नाहीये असे मालिकेत दाखवण्यात आलेले आहे.
या व्यक्तिरेखेमुळे मी खऱ्या आयुष्यात देखील असाच आहे असा अनेकवेळा लोकांचा समज होतो. या मालिकेमुळे मला असाच एक विचित्र अनुभव नुकताच आला आहे. माझ्या शेजारी राहाणाऱ्या लोकांचे माझ्याबाबतचे वागणे बदलले आहे. माझ्याशी पूर्वी बोलणारे लोकदेखील आता माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत.