इतिहासातून नेहमीच मला प्रेरणा मिळते - जितेंद्र जोशी

By तेजल गावडे | Published: October 12, 2018 02:27 PM2018-10-12T14:27:16+5:302018-10-12T14:30:02+5:30

सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचे गुणगान करणारा 'गर्जा महाराष्ट्र' हा कार्यक्रम दाखल झाला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता जितेंद्र जोशी करतो आहे.

I am always inspired by history - Jitendra Joshi | इतिहासातून नेहमीच मला प्रेरणा मिळते - जितेंद्र जोशी

इतिहासातून नेहमीच मला प्रेरणा मिळते - जितेंद्र जोशी

googlenewsNext


सोनी मराठी वाहिनीवर महाराष्ट्राच्या वैभवाचे गुणगान करणारा 'गर्जा महाराष्ट्र' हा कार्यक्रम दाखल झाला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता जितेंद्र जोशी करतो आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या निमित्ताने जितेंद्र जोशीची केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

'गर्जा महाराष्ट्र' या कार्यक्रमाबद्दल काय सांगशील?
महाराष्ट्रात जिथे आपण जन्माला आलो आहोत. त्या महाराष्ट्राला अनेक दिग्गज थोर व्यक्तिमत्व लाभले आहे. आजचा हा महाराष्ट्र त्या त्या शतकामध्ये इथे जन्माला आलेल्या महान व्यक्तींचे कार्य, कर्तृत्वामुळे घडला आहे. समाजकारण, राजकारण व कलासाहित्य अशा प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र पूर्वीपासून अग्रगणी राहिला आहे. त्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींचा सहभाग आहे. मग, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, श्रीमंत बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले व शाहू महाराज अशा अनेक दिग्गज व्यक्तींचा यात समावेश आहे. त्यांच्या आयुष्याचा, त्यांच्या कार्याचा व विचारांचा वेध घेणारा हा कार्यक्रम आहे. तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा व विचाराचा पुनर्विचार करून लोकांसमोर मांडण्याचा हा खेळ दशमी क्रिएशन्स व सोनी मराठीने रचला आहे  व याचा मला एक भाग होता आले. याचा मला अत्यंत आनंद आहे.


या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्याबद्दल काय सांगशील?
ज्या लोकांनी पुरोगामी महाराष्ट्र घडविला. त्या थोर व्यक्तींबद्दलची महती व त्यांचे विचार लोकांपर्यंत अत्यंत जबाबदारीने पोहचवावे लागतात. हे काम जबाबदारीने करत असताना प्रत्येक वाक्य व गोष्ट तपासून घेताना पुन्हा नव्याने त्यांचे विचार आपल्याला कळतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज या महान व्यक्तींचे विचार व कर्तृत्व प्रेक्षकांपर्यंत पोहचत आहे. जर त्यांचे विचार प्रेक्षकांच्या मनावर सकारात्मक उमटत असेल तर त्याचा आनंदच आहे.


या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये काय?
त्या काळातील महान व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाविषयी न बोलता त्यांचा काळ व कार्य किती अवघड होता, हे आज हा कार्यक्रम पाहताना समजते आहे. आजही आपण स्त्री-पुरूष समानता या गोष्टींवर बोलत आहोत. तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यावेळी याबाबतचा कसा विचार केला? त्यावेळी इंग्लंडमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकारदेखील नव्हता. त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री-पुरूष समानतेचा विचार मांडला. स्वतःच्या बायकोला म्हणजेच सावित्रीबाई फुलेंना शिकवले व स्त्रियांना शिकवायला सुरूवात केली. ह्या माणसांविषयी बोलत असताना एक सकारात्मक ऊर्जा मिळते. किती गोष्टींचा सामना करत त्यांनी महाराष्ट्र घडविला. आजच्या काळात त्यांचे विचार व कर्तृत्व सांगणे का गरजेचे आहे, यावर ही मालिका भाष्य करते. 

आतापर्यंत तू 'तुकाराम' व 'बघतोस काय मुजरा कर' अशा ऐतिहासिक व अशा मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केलेस, या सिनेमांकडे तू कशा पद्धतीने पाहतोस?
आजच्या काळात जगत असताना आपण त्याच्याशी सुसंगत होऊन जातो. इतिहासात डोकावून पाहिले पाहिजे असे नेहमी सांगितले जाते. कारण त्यावरून आपल्याला गोष्टी समजतात. मला इतिहासात डोकावून पाहिल्यावर नेहमीच प्रेरणा मिळाली आहे. आपण उंचच उंच इमारती, रस्ते, मॉल व मेट्रो ह्या गोष्टींची निर्मिती करत आहोत. आजच्या जगण्यासाठी या गरजेच्या गोष्टी आहेत का? तर मग ज्या अत्यंत कष्टाने करून ठेवलेल्या गोष्टी आहेत. त्याच्या जपणूकीसाठी आपण काही करतो आहोत का? याचा विचार आपण केला पाहिजे.

'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल काय सांगशील?
'सेक्रेड गेम्स'मध्ये मी साकारलेली हवालदार काटेकरच्या भूमिकेला इतका चांगला प्रतिसाद मिळेल, असे मला वाटले नव्हते. इतके माहित होते की मी साकारत असलेली भूमिका रसिकांच्या लक्षात राहील. पण इतका मोठा प्रतिसाद मिळेल, असे अजिबात वाटले नव्हते. त्यामुळे मी खूप खूश आहे.  

आणखीन वेबसीरिजमध्ये काम करताना दिसणार आहेस का?
आता तरी काही प्लान नाही. जे समोर येईल व आवडेल, रुचेल पटेल व आनंद देईल असे काम मी करतो आहे. त्यामध्ये कुठेही वेबसीरिजचा समावेश नाही.  

Web Title: I am always inspired by history - Jitendra Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.