संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज करतोय या मालिकेत काम, अशी मिळाली संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:03 PM2024-11-18T13:03:24+5:302024-11-18T13:04:33+5:30
Adhokshaj Karhade : 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत सर्वांच्या आयुष्यात खळबळ माजवायला आला आहे पंटर पिंट्या आणि समीर निकम. हे दोन वेगळे कलाकार नसून एकच आहे. या दोन्ही भूमिका साकारल्या आहेत अधोक्षज कऱ्हाडेने. अधोक्षज अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आहे.
'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada) मालिकेत सर्वांच्या आयुष्यात खळबळ माजवायला आला आहे पंटर पिंट्या आणि समीर निकम. हे दोन वेगळे कलाकार नसून एकच आहे. या दोन्ही भूमिका साकारल्या आहेत अधोक्षज कऱ्हाडे(Adhokshaj Karhade)ने. अधोक्षज अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आहे. भावाच्या पावलांवर पाऊल टाकत तोदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. नुकतेच अधोक्षजने या मालिकेतील भूमिकेबद्दल सांगितले.
अधोक्षज कऱ्हाडे म्हणाला की, 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत माझ्या भूमिकेचं नाव आहे समीर निकम उर्फ पंटर पिंट्या, नावाप्रमाणे तो अगदीच पंटर आहे. लहानपणापासूनच तो चोरी, पाकीटमारी किंवा कागदपत्र गायब करणे असे छोटे गुन्हे करत आला आहे आणि यासाठी त्याला अनेकदा तुरूंगातही रहावे लागले आहे. पण तो सराईत गुंडांसारखा क्रूर, दुष्ट नाही. तो मनानी अगदी साधा भोळा, प्रामाणिक आहे पण परिस्थितीमुळे त्याला हा मार्ग स्वीकारावा लागलाय. जालिंदर निंबाळकर उर्फ डॅड्डी यांनी एका विशेष कामगिरीसाठी पिंट्याची जेलमधून सुटका केली आहे. शत्रूला तेजश्रीशी लग्न करायचे आहे, पण तेजश्रीला हे मान्य नाही म्हणून जालिंदरने पिंट्याला म्हणजेच समीर नाईकला उभं केलंय. समीरच लग्न तेजूशी ठरवलं जात. हे पात्र नकारात्मक किंवा साकारातमक आहे असं म्हणता येणार नाही कारण या भूमिकेच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत.
अशी मिळाली भूमिका
तो पुढे म्हणाला की, या मालिकेत निवड होण्यासाठी झी मराठीची आणखीन एक मालिका कारणीभूत आहे असं मी म्हणेन. ३-४ वर्षापूर्वी मी 'घेतला वसा टाकू नको' नावाची मालिका करत होतो. त्या मालिकेचा क्रिएटिव्ह डायरेक्टर जो या मालिकेवर ही काम करत आहे त्याने माझं काम पाहिलं होतं. त्याने माझं नाव सूचवले. त्या दिवशी मी सासुरवाडीला कोल्हापूरला निघत होतो. तेव्हाच मला कॉल आला 'लाखात एक आमचा दादा' मालिकेमध्ये एक नवीन भूमिका आहे तुला करायला आवडेल का, मी लगेच होकार दिला. महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शन करून बाहेर येताच माझी निवड झाल्याचा कॉल आला आणि आज रात्रीच तुला साताऱ्याला पोहचायचे आहे. मी रात्रीच प्रवास करून पोहचलो आणि त्याच रात्री माझी लूक टेस्ट झाली आणि दुसऱ्यादिवशी पासून माझं शूटही सुरु झालं. प्रेक्षकांकडून आणि मित्रपरिवाराकडून खूप छान प्रतिसाद मिळत आहे.
इतर कलाकारांसोबत होतंय छान बॉण्डिंग
संकर्षणने माझ्यासाठी खूप छान पोस्ट टाकली होती ज्यामुळे मी ही भूमिका करत आहे हे अधिक लोकांपर्यंत पोहोचलं. जो प्रतिसाद मिळत आहे तो उत्तम आहे, लोक आपल्या कामाची स्तुती करत आहेत तर बरं वाटतंय आणि आता माझी जबाबदारी आहे की मी अजून छान काम करत रहावे. सेटवर माझे सर्वांशी खूप छान बॉन्डिंग जमायला लागलंय. बरेच कलाकार असे आहेत जे माझ्या ओळखीचे आहेत. गिरीश ओक सरांसोबत मी आधीपण काम केलंय आणि दिशा जी मालिकेत तुळजाची भूमिका साकारतेय तिच्यासोबत मी झी मराठीच्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये भाग घेतला होतो आणि तिथे आमची जोडी होती. नव्याने सुद्धा चांगल्या ओळखी होत आहेत. मालिकेत शत्रू आणि सुमेधा ताई आहे त्यांच्यासोबत ही छान बॉन्डिंग व्हायला लागलंय, असे अधोक्षजने सांगितले.
एक गोड भेट मिळाली
२०२४ वर्ष संपता संपता एक गोड भेट मिळाली आहे 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत काम मिळणं ही सर्वात गोड आठवण आणि भेट आहे . कारण झी मराठीचा प्रेक्षक वर्ग अतिशय मोठा आहे. त्यांचा रिचही वेगळा आहे महाराष्ट्र आणि भारतातच नाही तर परदेशात ही. झी मराठी वर वेगळ्या भूमिकेत, वेगळ्या मालिकेत, नवीन टीम सोबत काम करायला मिळणं ही प्रचंड मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. प्रेक्षकांना मी हेच सांगेन असंच प्रेम करत रहा, माझं काम बघत रहा , आशीर्वाद देत रहा आणि त्यासोबत सूचना ही देत जा, कारण त्या महत्वाच्या असतात, असे शेवटी त्याने म्हटले.