'वयाच्या सातव्या वर्षी मी पहिलं नाटक केलं'; 'ड्रामा ज्युनियअर्स'च्या स्पर्धकांना पाहून संकर्षण रमला जुन्या आठवणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 04:33 PM2024-06-21T16:33:03+5:302024-06-21T16:59:56+5:30
Sankarshan Karhade: छोट्या पडद्यावर लवकरच ड्रामा ज्युनिअर हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या बालकलाकारांना पाहून संकर्षण त्याच्या बालपणीच्या काळात हरवून गेला आहे.
सध्याच्या काळात लहान मुलांना त्यांच्यातील कलागुण दाखवण्यासाठी अनेक वेगवेगळी माध्यम मिळत आहेत. यात छोट्या पडद्यावरही असे अनेक रिअॅलिटी शो आहेत ज्यामधून लहान मुलांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळत आहे. यामध्येच सध्या प्रेक्षकांमध्ये ड्रामा ज्युनियर्स या आगामी रिअॅलिटी शोची चर्चा सुरु आहे. श्रेया बुगडे सूत्रसंचालन करत असलेल्या कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता खानविलकर परिक्षक पदाची जबाबदारी पार पाडणार आहेत. यामध्ये संकर्षणने या चिमुकल्या मुलांना पाहून त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
"ही संधी माझ्यासाठी मोठी परीक्षा आहे कारण, यावेळी मी परीक्षक म्हणून झी मराठीवर दिसणार आहे. आतापर्यंत निभावल्या भूमिकांपैकी खूपच वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे ही. मी निवेदक म्हणून काम केलंय, स्पर्धक म्हणून काम केलंय, मी स्पर्धा जिंकलो आहे आणि स्पर्धा हरलो सुद्धा आहे. पण मी परीक्षकाच्या खुर्चीवर कधीच बसलो नाहीये. आणि, आता या नवीन जबाबदारीमुळे पोटात गोळा ही आला आहे. पण मी खूप सकारात्मक दृष्टीने याकडे बघत आहे. कोणाला तरी असं वाटतंय मी या खुर्चीच्या लायक आहे आणि याचाच मला आनंद आहे. माझा प्रयत्न असेल त्या लहान मुलांना उत्तम मार्गदर्शन करायचं, कारण हेच ते वय आहे ज्या वयामध्ये आलेले अनुभव, बोललं गेलेलं वाक्य, केलेलं काम आयुष्यभर लक्षात राहतं", असं संकर्षण म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "मला सुद्धा माझी पहिली स्पर्धा, पहिली एकांकिका, पाहिलं बक्षीस, पाहिलं अपयश हे सगळं लक्षात आहे. या लहान मुलांसाठी सगळ्या गोष्टी पहिल्या पहिल्या असणार आहेत. म्हणून त्यांच्या पहिल्या कामाचे, यशाचे, अपयशाचे अनुभवांचे आपण साक्षीदार होणार आहोत याचा मला जास्त आनंद आहे. आजकाल व्हायरल होण्याचं युग आलं आहे या युगात या स्पर्धेत सहभागी होऊन आपण स्वतःला कुठे पोहचवू शकतो हे तपासून पाहण्याचा एक वेगळा एलिमेंट या शो मध्ये आहे. आता पर्यंतच्या ऑडिशन्स पाहून असं वाटतं की आजकालच्या मुलांमध्ये खूप सहजता आलेली आहे. कारण त्यांना एक्सपोजर मिळाले आहे. जेव्हा मी या वयाचा होतो तेव्हा मी महाराष्ट्रभर एकांकिका करत फिरत होतो. माझं मुळ गाव मराठवाड्यातलं परभणी आहे. पण मी यांच्या वयाचा होतो तेव्हाच कामाची सुरुवात केली हे मात्र नक्की. ७ वर्षाचा होतो जेव्हा मी माझ्या पहिल्या नाटकात काम केले. मी शिक्षणाकडे गरजेपुरतं लक्ष देऊन इतरांची नाटकं पाहत होतो, पुस्तकं वाचायची सुरुवात केली होती आणि प्रायोगिक स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धा करून महाराष्ट्रभर फिरत होतो."
दरम्यान, ड्रामा ज्युनिअर हा कार्यक्रम येत्या २२ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता लवकरच संपणार आहे.