"मला माझ्यात स्कंदमातेचे गुण दिसतात...", नेत्रा फेम तितिक्षा तावडेनं सांगितला तो किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:49 PM2024-10-08T16:49:09+5:302024-10-08T16:50:35+5:30
Titiksha Tawde : झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील नेत्राच्या भूमिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे हिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
झी मराठी वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satvi Mulagi) या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील नेत्राच्या भूमिकेतून अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titiksha Tawde) हिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. दरम्यान, नवरात्रीच्या खास प्रसंगी ' सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील नेत्रा म्हणजेच तितिक्षा तावडेने सांगितले कोणत्या देवीच्या रूपाचे गुण तिला तिच्यामध्ये दिसतात.
तितिक्षा तावडे म्हणाली की, "मला ज्या देवींचे गुण माझ्यात दिसतात ती म्हणजे स्कंदमाता जिच्यामध्ये मातृत्वची शक्ती आहे. मला वाटत की माझ्यात ही आईची माया आणि सर्वांची काळजी घेणे असे गुण आहेत. दुसरी आहे ती माता सिद्धीदात्री जिच्यात अलौकिक शक्ती आहेत आणि मला वाटतं प्रत्येक स्त्री ही सिद्धीदात्री रूपाचा अंश आहे. प्रत्येक स्त्री मध्ये माता सिद्धीदात्रीची शक्ती आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्यातील स्त्रीशक्ती जागरूक होण्याची गरज आहे कारण मी खूपच सुरक्षित बॅकग्राऊंडमध्ये राहिली आहे. पण जेव्हा शाळेत जाऊ लागले विचित्र घटना घडू लागल्या त्यात काही गोष्टी म्हणजे रिक्षावाल्याने आरसा अॅडजस्ट करून बघणे आणि ते पाहून मग मी आपलं अंग चोरून बसणं, कॉलेजसाठी कधीतरी ट्रेनमध्ये जेन्टस डब्यामधून प्रवास करताना काही पुरुषचं बिनधास्त बघत राहणं आणि माझं त्या परिस्थितींना दुर्लक्ष करणं, कारण तेच हुशारीचा वागणं आहे असे वाटायचे. त्यांना राग आला आणि रागाच्याभरात त्यांनी काही केले तर अश्या गोष्टी तेव्हा सांगण्यात आल्या होत्या.
तितिक्षाने सांगितला तो किस्सा
ती पुढे म्हणाली की, जेव्हा माझं मला कळायला लागले तेव्हा समजले की अशा वागण्याने फक्त अश्या पुरुषांची संख्या वाढेल. माझा ११ वी तला एक किस्सा आहे जेव्हा मी परिवारसोबत ट्रेन मध्ये लांबचा प्रवास करत होते आणि तिथे एक माणूस मला त्या पूर्ण ८-९ तासाच्या प्रवासात सतत वाईट नजरेने बघत होता. तो पूर्ण प्रवास माझा टेंशन मध्ये गेला. आमचं स्टेशन आलं आणि आम्ही बॅग काढत होतो उतरायच्या तयारी करत होतो. पण आता तो बिंधास्त नजर मिळवून बघत होता, हसत होता. इतका आत्मविश्वास वाढला त्याचा. तेव्हा माझा बांध तुटला आणि कुठून माझ्यात शक्ती आली आणि मी जोरात ओरडले त्याच्यावर, त्याआधी मी माझ्या परिवाराचं लक्ष वेधलं आणि त्यांना सर्व सांगितले. हे सगळे पाहून तो लगेच घाबरला आणि दुसऱ्या बोगीत पळाला. तेव्हा मला कळले की अशा व्यक्ती ही खूप घाबरतात पण आपण हिंमत दाखवून त्यांना थांबवले पाहिजे आणि मी या अनुभवा नंतर ही गोष्ट लक्षात ठेवली आणि आजही मी त्यावर अमल करते.
स्वसंरक्षण करणं गरजेचे आहे
फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्या स्त्रियांसाठी ही उभी राहते. नवरात्री सुरु आहेत आणि नव देवींची काही ना काही वैशिष्ट आहेत. मला खूप मनापासून या नव देवींना सांगायचे आहे की तुम्हा सर्वांची शक्ती मिळून जे बळ तयार होईल ते प्रत्येक स्त्री मध्ये कठीण परिस्थितीच्या काळात येऊ दे. मग ते चातुर्य असुदे किंवा शारीरिक बळ कारण खूप प्रयत्न झाले आहेत लोकांच्या विचारात बदल घडवण्यासाठी पण स्वसंरक्षण करणं गरजेचे आहे, असे तिने म्हटले.