गर्भवती असताना सतत मनात यायचा आत्महत्या करण्याचा विचार, या अभिनेत्रीने केला गौप्यस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 13:11 IST2021-04-20T13:11:00+5:302021-04-20T13:11:12+5:30
मी गर्भवती असताना आत्महत्या करण्याचा विचार सतत माझ्या मनात येत होता असे या अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले आहे.

गर्भवती असताना सतत मनात यायचा आत्महत्या करण्याचा विचार, या अभिनेत्रीने केला गौप्यस्फोट
एका अभिनेत्रीने तिच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. हे ऐकून लोकांना चांगलाच धक्का बसला आहे. मी गर्भवती असताना आत्महत्या करण्याचा विचार सतत माझ्या मनात येत होता असे या अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले आहे.
सौम्या सेठने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण नव्या… नयी धडकन नये सवाल या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तसेच अशोका या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तिने या मुलाखतीत सांगितले आहे की, 2015 मध्ये माझं लग्न झालं, त्यानंतर मी काहीच वर्षांत गर्भवती होते. माझ्या आयुष्यात त्यावेळी प्रचंड प्रॉब्लेम सुरू होते. त्यामुळे माझे आई-वडील वर्जीनियाला येईपर्यंत मी आत्महत्या करण्याचे वेगवेगळे प्रकार शोधत होते. पण माझ्या पालकांनी मला मदत केली आणि या भयानक परिस्थितीतून बाहेर काढले.
तिने पुढे सांगितले की, तो असा काळा होता की, मी गर्भवती असूनही मी कित्येक दिवस जेवत नव्हते. आरशात उभी राहिल्यावर मी स्वतःला ओळखत देखील नव्हते. केवळ स्वतःला संपवण्याचा विचार माझ्या मनात सुरू होता. पण मी गरोदर असल्याने मला जाणवले की, मी आत्महत्या केली तर माझ्या मुलाला कधीच कळणार नाही की, त्याची आई त्याच्यावर किती प्रेम करत होती... मी स्वतःला मारण्याचा विचार करू शकत होती... पण त्याला इजा करण्याचा विचार देखील करू शकत नव्हती... माझ्या बाळाला आईशिवाय जगावे लागेल हा विचार करून मी आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला... माझ्या मुलाने माझा जीव वाचवला.
2015 मध्ये सौम्याने अरुण कुमार सोबत अमेरिकेत एका रिसॉर्टमध्ये लग्न केले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. सध्या ती वर्जीनियामध्ये प्रॉपर्टी डीलरचे काम करते.