"तू सुंदर दिसत नाहीस, असं म्हणत मला केलं होतं रिजेक्ट", रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:39 PM2023-10-04T15:39:40+5:302023-10-04T15:41:03+5:30
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अभिनेत्रीने इंडस्ट्रीत तिला आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे.
झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या तिन्ही सीझनला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या मालिकेनं निरोप घेऊन खूप वेळ उलटून गेला आहे. तरीदेखील या मालिकेनं आणि यातील पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या तिसऱ्या भागात अभिनेत्री कृतिका तुळसकरने शेवंताची भूमिका केली होती. नुकतेच एका मुलाखतीत कृतिकाने तिला इंडस्ट्रीत आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले.
कृतिका तुळसकर हिने तिच्या दिसण्यावरून आलेला एक अनुभव शेअर केला आहे. तू जाड आहेस, तू बुटकी आहेस, तू काळी आहेस असं तुम्हाला कोणी म्हटलंय का? मला म्हटलंय. बऱ्याच वर्षांपूर्वी तू सुंदर दिसत नाही असं सांगून मला एका मालिकेसाठी रिजेक्ट केले होते. पण त्यानंतर मी रात्रीस खेळ चाले मालिकेच्या सेटवर माझ्या चाहत्यांना भेटत होते. तेव्हा ते येऊन मला सांगत होते की, तुम्ही किती सुंदर दिसता. सोशल मीडियावर सुद्धा बरेच प्रेक्षक माझे चाहते मला सुंदर दिसता म्हणून सांगत होते.
ती पुढे म्हणाली की, मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही कसेही दिसत असला, तुमची शारीरिक ठेव कशीही असली तरी प्रत्येकजण हा सुंदर दिसतच असतो. कोणी काहीही म्हटलं तरी आपण निराश होऊन रडत बसण्यापेक्षा आपले सौंदर्य कसे वाढवू याकडे लक्ष दिले पाहिजे.
वर्कफ्रंटबद्दल...
रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत शेवंताच्या भूमिकेतून कृतिका तुळसकर घराघरात पोहचली. या मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली आहे. ती गेल्या १८ वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत आहे. तसेच ती अनेक नाटक आणि चित्रपटात झळकली आहे. ती कथ्थक विशारदही आहे. विशेष बाब म्हणजे ती मानसोपचारतज्ञ म्हणूनही कार्यरत आहे.