'...मला धडकी भरली होती', 'आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीने शेअर केला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 11:47 AM2021-08-10T11:47:47+5:302021-08-10T11:48:14+5:30
'आई कुठे काय करते' मालिका सध्या भावनिक वळणावर आली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेतील पात्र आणि कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. सध्या ही मालिका नवीन वळणावर आली आहे. अरूंधती आणि अनिरुद्ध अखेर कायमचे वेगळे झाले आहेत. त्यामुळे देशमुख कुटुंबातील सदस्यांना अरुंधतीची खूप आठवण येते आहे. अरुंधती घटस्फोटानंतर समृद्धी बंगला सोडून तिच्या आईच्या घरी रहायला आली आहे. या मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने निभावली आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत घटस्फोटानंतरचे सीन शूटिंग केल्याचा अनुभव शेअर केला आहे.
मधुराणी प्रभुलकर हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आई कुठे काय करते मालिकेतील फोटो शेअर करत लिहिले की, आई ची आई....! अरुंधती आता घटस्फोट घेऊन आईकडे राहायला आली आहे. तिच्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास सुरु झाला आहे..ह्याच घरात लहानाची मोठी झाली ...सारं बालपण तारुण्य इथे गेलं आणि नंतर लग्न करून भव्य अशा समृद्धी बंगल्यात गेली ...आणि आता वयाच्या आणि आयुष्याच्या विचित्र वळणावर पुन्हा त्या वास्तूत परतली आहे... ओंजळीत निव्वळ आठवणी घेऊन..! पुढे काय? हा प्रश्न तिच्या तसाच माझ्याही मनात आहेच...
तिने पुढे पोस्टमध्ये म्हटले की, एवढ्या मोठ्या समृद्धी बंगल्यातून थेट ह्या छोट्या खोलीत शूट करणे म्हणजे मला धडकी भरली होती... इतके महत्वाचे सीन इथे कसे होणार जागाच नाही आहे....असे मनात येत होते..पण आमचे कमाल दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांनी त्या एवढ्याशा जागेत हे सगळे सीन असे काही डिझाइन केले की आम्ही सगळेच थक्क झालो... आईच्या या घरातले सीन्स इतके सुंदर बनतील अशी कल्पनाच नव्हती केली आम्ही....
मेधाताईंबरोबर आणि केदार शिरसेकर बरोबर काम करणे म्हणजे केवळ धम्माल..! मेधाताईंच्या स्पर्शातच माया आहे..ती पहिल्या सीनपासूनच मला जाणवत आली आहे...आणि केदार म्हणजे सुधीरच...दुसरा कुणी तिथे असूच शकत नाही. आता आम्ही कलाकार आणि प्रेक्षकसुद्धा त्या जागेच्या प्रेमात पडलोत..., असे मधुराणीने या पोस्टमध्ये म्हटले.