"इंडिया जीता है, हराके पाकिस्तान...", भारताच्या विजयानंतर उत्कर्ष शिंदेने काही मिनिटांत तयार केलं जबरदस्त गाणं, होतंय व्हायरल
By सुजित शिर्के | Updated: February 24, 2025 11:28 IST2025-02-24T11:24:13+5:302025-02-24T11:28:24+5:30
अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) टीम इंडियाला खास सांगीतिक शुभेच्छा दिल्या आहेत.

"इंडिया जीता है, हराके पाकिस्तान...", भारताच्या विजयानंतर उत्कर्ष शिंदेने काही मिनिटांत तयार केलं जबरदस्त गाणं, होतंय व्हायरल
Utkarsh Shinde: काल दुबईच्या मैदानावर रंगलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या महामुकाबल्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजय मिळवला. भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. याशिवाय भारताचा स्टार फलंदाज स्टार फलंदाज विराट कोहलीने ५९ वे एकदिवसीय शतक झळकावताना १११ चेंडूंत ७चौकारांसह नाबाद १०० धावा केल्या. यासह यजमान पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हानही संपल्यात जमा झाले असून, भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतीय नागरिकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. दरम्यान, याचनिमित्ताने मराठमोळा अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) खास टीम इंडियाला सांगीतिक शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
अभिनेता उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याची प्रत्येक पोस्ट ही लक्ष वेधून घेणारी असते. नुकतीच उत्कर्षने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने मिळवलेल्या विजयानंतर सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट करत टीम इंडियाला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडिया विजयी होताच अवघ्या काही मिनिटांत उत्कर्षने जबरदस्त गाणं केलं आणि ते संगीतबद्धही केलं. "मारा है मैदान देखो जी शेरों ने, अरे रोना शुरु किया देखो जी औरोने...; लहराया देखो, देखो जी परचम खेलें है लगाके जान..., इंडिया जीता है, जीता है जीता है हराके पाकिस्तान...!" अशा या गाण्याच्या जबरदस्त ओळी आहेत.
याशिवाय उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओचं कॅप्शन देखील नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. "इंडिया जीता है हराके पाकिस्तान...", २ मिनिटात सुचलं बनवला गायला गाणं लगेच टीम इंडियाला दिल्या सांगीतिक शुभेच्छा #लव्ह यू इंडिया. बाकीच्यांचे भोंदू भाकीत गेले पाण्याच्या टाकीत. म्हणे इंडिया हरणार..." असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. उत्कर्षने भारतीय संघाच्या विजयानंतर तयार केलेलं गाणं नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, विजयाचा आनंद आहे टीम इंडिया मध्ये,हर्ष झाला आदर्श आणि उत्कर्षांमध्ये आणि शिंदे शाहिमुळे आम्हा रशीक प्रेक्षकांमध्ये......!! तर आणखी एका यूजरने लिहिलंय, भारत पाकिस्तान बर जिंकण म्हणजे वेगळा आंनद असतो..." अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.