'बॉलिवूडमध्ये मला संधी मिळाली तर..'; मराठी अभिनेत्याने व्यक्त केली इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 06:08 PM2023-09-05T18:08:48+5:302023-09-05T18:09:08+5:30
Ayush sanjiv: हा अभिनेता सध्या ३६ गुणी जोडी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
सध्याच्या काळात कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळे बॉलिवूड कलाकार आता मराठीत काम करताता दिसून येतात. यात मराठीमध्येही असे काही कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं आहे. यात सध्या छोट्या पडद्यावरील एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये काम करायचं असून त्याने त्याला पहिली भूमिका कोणती मिळावी हेदेखील सांगितलं आहे.
'३६ गुणी जोडी' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे आयुष संजीव. या मालिकेत वेदांत वानखेडे ही भूमिका साकारुन त्याने बरीच लोकप्रियता मिळवली. अलिकडेच आयुषने त्याच्या गोकुळाष्टमीच्या काही आठवणींना उजाळा दिला. या आठवणी शेअर करत असताना त्याने बॉलिवूडमध्ये काम करायची इच्छा व्यक्त करुन दाखवली.
"मी माटुंग्याला असतांना कृष्ण जन्माष्टमीच्या तसेच दही हंडीचा थरार अनुभवला आहे. सगळे आमचे सवंगडी आम्ही एकत्र येऊन अत्यंत उत्साहाने दही हंडी फ़ोडायचो. एकदा तर मला प्रत्यक्ष शेवटच्या थरावर जाऊन दहीहंडी फोडायला मिळाली. तो फार अविस्मरणीय असा क्षण होता. मी आजही त्या क्षणाने इतका भारवलेलो आहे की माझी एक मनापासूनची इच्छा आहे बॉलिवूडमध्ये मला संधी मिळाली तर प्रथम दहीहंडी फोडण्याचा प्रसंग किंवा गाणे असावे", असं आयुष म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "अजून एक छानशी आठवण म्हणजे लहानपणी आम्ही जेव्हा बदलापूरला राहायला गेलो तेव्हा तिकडे दहीहंडी फारशी कोणी साजरी करत नव्हते. आम्हा दोघा भावंडांचा फारच हिरमोड झाला त्या वेळी मात्र आमच्या आईने घरामध्येच एक सुंदरशी दहीहंडी तयार करून आमच्या भावंडांच्या आनंद द्विगुणित केला आणि आम्ही अगदी उत्साहाने ती दही हंडी फोडली. त्या वेळी माझ्या छोट्या भावाला कृष्णरूप दिले. आयुष्यात ही गोष्ट एक मखमली आठवण म्हणून कायम लक्षात राहील. श्री कृष्ण हा प्रेमसागर आहे, आपण जनमाणसानी हा एक गूण घेण्याची अत्यंत गरज आहे."