शरद पवार काँग्रेसमध्ये असते तर पंतप्रधान झाले असते- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 10:23 PM2022-07-29T22:23:09+5:302022-07-29T22:24:38+5:30
राज्याचं चार वेळा मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात कृषी तसंच संरक्षण मंत्री असा समृद्ध राजकीय प्रवास करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदानं आजवर हुलकावणी दिली आहे.
मुंबई-
राज्याचं चार वेळा मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात कृषी तसंच संरक्षण मंत्री असा समृद्ध राजकीय प्रवास करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधानपदानं आजवर हुलकावणी दिली आहे. शरद पवार अजूनही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. कारण पवारांचा राजकीय संघर्ष अजूनही संपलेला नाही. पण शरद पवार जर काँग्रेसमध्ये असते तर ते आतापर्यंत पंतप्रधान झाले असते असं खुद्द पवारांची कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना वाटतं. 'झी मराठी'वरील एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे.
सुप्रिया सुळेंचा पंतप्रधान मोदींशी गुजराती भाषेत संवाद; ऐकून तुम्हीही म्हणाल 'ખુબ સરસ લાગ્યુ'
झी मराठीवर आजपासून ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरू झाला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक आणि अभिनेता सुबोध भावे यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध महिला सेलिब्रिटींशी मनमोकळ्या आणि दिलखुलास गप्पा मारल्या जाणार आहेत. सुप्रिया सुळे यांना यावेळी सुबोध भावे यांनी शरद पवार काँग्रेसमध्ये असते तर पंतप्रधान झाले असते असं वाटतं का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देण्यासाठी सुप्रिया सुळे दोन पर्याय देण्यात आले होते. कधीच नाही किंवा कधीकधी यापैकी एक पर्याय सुप्रिया सुळे यांना निवडायचा होता. सुप्रिया सुळे यांनी कधीकधी नावाची पाटी दाखवत सहमती दर्शवली.
"कधीकधी असं वाटतं. पण पदाला त्यांनी कधीच महत्व दिलं नाही. कामाला महत्व दिलं", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी दिलखुलासपणे विविध प्रश्नांना उत्तरं दिली. तसंच हलक्याफुलक्या वातावरणात रंगलेल्या या कार्यक्रमात त्यांनी काही किस्सेही सांगितले. जेव्हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शपथ घेतली, त्यावेळी तुमच्या घरातील वातावरण कसे होते? त्यावर सुप्रिया सुळे यांनी अतिशय मजेशीर पणे उत्तर दिले की, त्यावेळी मी झोपेत होते. तसंच सुप्रिया सुळे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीसह विविध विषयांवर आपलं मत मांडलं.