‘इंडियन आयडल’च्या बक्षिसाच्या रकमेचं काय केलं? अभिजीत सावंतने इतक्या वर्षानंतर केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:30 AM2021-09-29T11:30:05+5:302021-09-29T11:31:49+5:30
मधली काही वर्ष अभिजीत फार कुठं दिसला नाही. पण अधूनमधून या ना त्या कारणानं त्याची चर्चा होत नाही. सध्या चर्चा आहे ती त्याच्या ताज्या मुलाखतीची.
‘इंडियन आयडल’ (Indian Idol) या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनचा पहिला विजेता कोण तर अभिजीत सावंत (Abhijeet Sawant). हा शो जिंकल्यानंतर अभिजीत रातोरात स्टार झाला. ‘आपका अभिजीत’ नावानं त्याचा एक अल्बम रसिकांच्या भेटीला आला. त्यानंतर ‘जुनून’ या अल्बमलाही रसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. ‘आशिक बनाया आपने’ या सिनेमासाठी अभिजीतनं ‘मरजावा’ हे गाणंही गायलं. ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हा त्याचा अल्बम तर प्रचंड हिट ठरला होता. मधली काही वर्ष अभिजीत फार कुठं दिसला नाही. पण अधूनमधून या ना त्या कारणानं त्याची चर्चा होत नाही. सध्या चर्चा आहे ती त्याच्या ताज्या मुलाखतीची.
‘इंडियन आयडल’चे पहिलं पर्व जिंकल्यानंतर त्याला काही रक्कम मिळाली होती. या जिंकलेल्या रकमेचं काय केलं? हे त्यानं या मुलाखतीत सांगितलं.
अभिजीत म्हणाला, ‘ ती रक्कम मी चांगल्या ठिकाणी गुंतवली. 2008च्या आर्थिक मंदीदरम्यान आम्ही पैशांची बचत केली होती. त्यातून आम्ही काही ठिकाणी गुंतवणूक केली होती. काही वर्षांपूर्वी मी एक घर खरेदी केलं होतं. पण आता मात्र मला याचा पश्चाताप होतोय. कोरोना महामारीआधी मी माझ्या म्युझिक करिअरबद्दल फार असमाधानी होतो. भलेही पैसे मिळत होते. पण त्यावेळी मी फार समधानी नव्हतो. तुम्ही पैशांच्या मागे धावत तेव्हा तुम्हाला तुमची प्रतिभा, तुमचे संगीत, तुमचे ज्ञान यासारख्या अनेक गोष्टींशी तडजोड करावी लागते.’
इंडस्ट्रीतील शो-ऑफ संस्कृतीबद्दलही तो बोलला. मी सुद्धा या इंडस्ट्रीचा भाग बनलो. मलाही या शो ऑफ करणा-या संस्कृतीपुढं झुकावं लागलं, असं तो म्हणाला.
अनेकांनी मला रिजेक्ट केलं....
एका जुन्या मुलाखतीत अभिजीत रिजेक्शनवर होता. ‘आपली इंडस्ट्री टॅलेंटवर कमी आणि ओळखीला जास्त प्राधान्य देते. बहुतांश संगीतकार आपल्या ओळखीच्या गायकांनाच संधी देतात. गेल्या 15 वर्षांच्या काळात अनेकांनी मला रिजेक्ट केलं. कारण मी त्यांच्या गटातील गायक नव्हतो. रिअलिटी शोमधील कलाकार रातोरात प्रसिद्ध होतात, त्यांचा खुप मोठा फॅन फॉलोअर्स असतो. मात्र त्यांच्यासोबत काम करायला इंडस्ट्रीमधील कलाकार कंफर्टेबल नसतात.हेच खरं वास्तव असल्याचे अभिजीतने सांगितलं होतं.