सचिन तेंडुलकरने इंडियन आयडॉल 11 च्या स्पर्धकांबद्दल केले हे भन्नाट ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 06:00 PM2019-10-25T18:00:00+5:302019-10-25T18:00:02+5:30
इंडियन आयडॉल 11 मधील स्पर्धकांनी त्यांच्यातील गायन-प्रतिभेच्या बळावर आत्ताच अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रज्ञावंत मुलांच्या गाण्याने अचंबित झालेल्यांमध्ये सचिन तेंडुलकर देखील सामील झाला आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. आता या कार्यक्रमाचा नवा सिझन म्हणजेच इंडियन आयडल 11 प्रेक्षकांच्या भेटीस आला असून यात नेहा कक्कड, विशाल दादलानी, अनू मलिक परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत तर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आदित्य नारायण सांभाळत आहे. या वर्षीच्या ‘इंडियन आयडॉल’ची थिम ‘एक देश एक आवाज’ अशी आहे.
इंडियन आयडॉल 11 मधील स्पर्धकांनी त्यांच्यातील गायन-प्रतिभेच्या बळावर आत्ताच अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रज्ञावंत मुलांच्या गाण्याने अचंबित झालेल्यांमध्ये सचिन तेंडुलकर देखील सामील झाला आहे. याचे भाग बघितल्यानंतर या स्पर्धकांची त्याने तोंड भरून स्तुती केली आहे आणि विशेषतः पंजाबचा सनी, ओदिशाची चेल्सी, महाराष्ट्राचा राहुल आणि झारखंडचा दिवस कुमार यांच्याबद्दल त्याने खास ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्याने लिहिले आहे की, या सत्रात किती अप्रतिम गायक सहभागी झाले आहेत! हे सर्व वेगवेगळ्या भागांमधून आलेले आहेत... पण त्यांना जोडणारी संगीत ही एक गोष्ट आहे. इंडियन आयडॉलमधील त्यांच्या प्रवासाबद्दल त्याने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Really touched by the soulful singing & life-stories of these talented youngsters on Indian Idol.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 22, 2019
Rahul, Chelsi, Diwas and Sunny come from different parts of the country but have the same passion & dedication for music despite all odds.
I’m sure they’ll go a long way. pic.twitter.com/dNqNd2iGmk
ओदिशाची चेल्सी सांगते, “माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की, सचिन सारख्या महान व्यक्तीने माझ्या आवाजाबद्दल ट्वीट केले आहे. मी इंडियन आयडॉलची ऋणी आहे कारण त्याच्यामुळे माझा आवाज इतक्या लोकांपर्यंत पोहोचला आहे.”
पंजाबचा सनी सांगतो, “जेव्हा एका स्पर्धकाने मला सांगितले की, सचिन तेंडुलकरने माझ्या परफॉर्मन्सबद्दल ट्वीट केले आहे, तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता. ते ट्वीट मी स्वतः पाहिले आणि आनंदाने अक्षरशः उड्या मारू लागलो. हे सगळे इंडियन आयडॉलमुळेच शक्य झाले आहे. इंडियन आयडॉलच्या मंचाचा मी अत्यंत ऋणी आहे.”
महाराष्ट्राचा राहुल खरे सांगतो, “मी जेव्हा ते ट्वीट पाहिले तेव्हा मला धक्काच बसला. ज्या माणसाचे नाव मी क्रिकेट बघायला लागल्यापासून ऐकतो आहे, त्याने माझ्याबद्दल ट्वीट केले आहे. मला इतका आनंद झाला की, मी माझ्या गाण्याने क्रिकेटच्या देवाला प्रभावित करू शकलो आणि हे सगळे शक्य झाले ते इंडियन आयडॉलमुळे.
झारखंडचा दिवस कुमार सांगतो, “सचिन सर हे सर्वांचेच आदर्श आहेत. त्यांच्याकडून कौतुकाचा शब्द मिळणे हे माझ्यासाठी किती भाग्याचे आहे. मी हे ट्वीट जेव्हा वाचले तेव्हा मला किती आनंद झाला ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.”