कधी एअरपोर्टवर तमाशा तर कधी मुलीची थप्पड! आदित्य नारायणने ओढवून घेतले आहेत अनेक वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 04:43 PM2021-05-26T16:43:42+5:302021-05-26T16:44:01+5:30
वाद आणि आदित्य नारायण यांचे जुने नाते आहे. कारण याआधीही त्याने अनेक वाद ओढवून घेतले आहेत.
उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या चर्चेत आहे तो इंडियन आयडल 12 च्या (Indian Idol 12) एका वादामुळे. होय, शोच्या ‘किशोर कुमार स्पेशल एपिसोड’वरून सुरु झालेल्या या वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य नारायण सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतोय.
खरे तर वाद आणि आदित्य नारायण यांचे जुने नाते आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण याआधीही त्याने अनेक वाद ओढवून घेतले आहेत. (Indian Idol 12 Aditya Narayan top controversies )
एक वाद आहे 2017 सालचा. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, 2017 साली रायपूर एअरपोर्टच्या स्टाफला आदित्यने अगदी चड्डी उतरवण्याची धमकी दिली होती. मर्यादेपेक्षा जास्त लगेज घेऊन जात असल्यामुळे विमानतळावरील स्टाफने आदित्यला 13 हजार रुपये जमा करायला सांगितले. आदित्य यामुळे चिडला होता. मी 10 हजारांपेक्षा जास्त एक रूपयाही देणार नाही, असे म्हणत त्याने त्या कर्मचा-याला चड्डी उतरवण्याची धमकीही दिली होती. आदित्यच्या या लाजिरवाण्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
2018 साली आदित्यला वेगाने ड्रायव्हिंग करत एका ऑटोरिक्षाला धडक मारल्याच्या आरोपाखाली वर्सोवा पोलिसांनी अटक केली होती. रिक्षातील महिलेने आदित्यविरोधात तक्रार दाखल केली होती. अर्थात आदित्य घटनास्थळावरून फरार न होता अपघातात जखमी झालेल्या महिला व आॅटोचालकाला रूग्णालयात घेऊन गेला होता.
2011साली आदित्य आपल्या मित्रांसह एका बारमध्ये गेला होता. मद्यधुंद अवस्थेत असताना तो एका मुलीशी वाद घालत होता. त्यावर चिडून त्या मुलीने आदित्यला थप्पड मारली होती, असे सांगितले जाते, आदित्यने मात्र याचा इन्कार केला होता. मी मित्रांसोबत बारमध्ये गेलो होतो. तिथे वादही झाला होता; मात्र या वादात कोणीही मुलगी नव्हती. त्यामुळे मुलीने थप्पड मारण्याचा प्रश्नच नव्हता, असे स्पष्टीकरण आदित्यने दिले होते.
इंडियन आयडल 11 मध्ये आदित्य एका वेगळ्याच कारणाने टीकेचा लक्ष्य ठरला होता. नेहा कक्करसोबत त्याने केलेला लग्नाचा ड्रामा केला होता. मी इंडियन आयडलच्या सेटवर नेहाशी लग्न करणार, असे त्याने जाहीर केले होते. पण हा नुसता टीआरपीसाठी केलेला एक स्टंट होता.
सध्या आदित्य नारायण लोकप्रिय गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे ट्रोल होतोय. शिवाय अलिबागवासीयांच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने तो मनसेच्या निशाण्यावर आला होता. त्याबद्दल त्याला हात जोडून माफीही मागावी लागली.