Indian Idol 13: अरेरे...! ‘इंडियन आयडल 13’चा असाही ‘प्रताप’; ‘आशिकी’ फेम अनु अग्रवालला शोमध्ये बोलावलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 05:12 PM2022-11-17T17:12:19+5:302022-11-17T17:13:46+5:30
Indian Idol 13, Anu Aggarwal: ‘इंडियन आयडल’चा मागचा सीझन अनेक कॉन्ट्राव्हर्सीमुळे चर्चेत होता. आता नव्या सीझननेही असाच एक वाद ओढवून घेतला आहे...
‘इंडियन आयडल’चा मागचा सीझन अनेक कॉन्ट्राव्हर्सीमुळे चर्चेत होता. आता नव्या सीझननेही असाच एक वाद ओढवून घेतला आहे. होय, ‘आशिकी’ (Aashiqui) या तुफान गाजलेल्या चित्रपटाची नायिका अनु अग्रवाल ‘इंडियन आयडल 13’च्या (Indian Idol 13) मेकर्सवर नाराज आहे. कारणही तसंच आहे. होय, ‘इंडियन आयडल 13’च्या मेकर्सनी गेल्या आठवड्यात ‘आशिकी’च्या कास्टला स्पेशल गेस्ट म्हणून शोमध्ये बोलवलं. राहुल रॉय, अनु अग्रवाल (Anu Aggarwal), दीपक तिजोरी, कुमार सानू सगळेच या शोमध्ये दिसले. पण यावेळी अनुसोबत असं काही घडलं की, ज्याची तिनेही कल्पना केली नव्हती. होय, मेकर्सनी अनुचे अनेक सीन्स कापले. यामुळे अनु कमालीची नाराज आहे. अर्थात तिला याचा मुद्दा बनवायचा नाही.
‘इंडियन आयडल 13’मध्ये अनु दीपिक तिजोरी व राहुल रॉयच्या बाजूला बसली होती. पण शोमधून जणू ती नाहीच, अशा पद्धतीने तिच्या सीन्सला कात्री लावली गेली. ‘इंडिया डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत अनुने याबद्दलची नाराजी व्यक्त केली.
खरं सांगू मला दु:ख झालं...
खरं सांगू मला दु:ख झालं. मी शोमध्ये जे काही बोलले ते मोटिवेशनल होतं. पण मी बोलले ते लोकांपर्यंत पोहोचलंच नाही. मला माझ्या फेमची चिंता नाही. पण माझे शब्द लोकांसाठी होते. त्यांना प्रेरणा देणारे होते. आपण एकमेकांपासूनच प्रेरणा घेत असतो. मी यासाठी कुणालाही जबाबदार ठरवणार नाही. शोमधील सर्वांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे. मी ‘इंडियन आयडल 13’मध्ये स्टेजवर गेले आणि सर्वांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. मी भारावले होते. कुमार सानू टाळ्या वाजवत होते. सगळे मला पाहून उठून उभे झाले होते. त्याक्षणी मी देवाचे आभार मानत होते. पण हे सगळं डिलीट केलं गेलं. मी चॅनलला दोष देत नाहीये. मी एक सेल्फ मेड आणि सेल्फ हील गर्ल आहे. माझ्यासाठी माझ्यासारख्या मुलींना प्रेरणा देणं हा उद्देश आहे. पण काहीच दाखवलं गेलं नाही, असं अनु म्हणाली. मेकर्सने अद्याप यावर काहीही उत्तर दिलेलं नाही.
अनुने ‘इंडियन आयडल 13’च्या सेटवरचे काही फोटो तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केले होते.
अपघात झाला आणि सगळं बदललं...
‘आशिकी’नंतर अनूचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले होते. करियर रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असतानाच 1999 मध्ये तिच्या गाडीला अपघात झाला. 1999 मध्ये एका रात्री पार्टीहून घरी परतत असताना अनुच्या गाडीला भीषण अपघात झाला. एका कारने तिच्या कारला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, अनु रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. भर रस्त्यात झालेल्या या अपघातानंतरही अनुला कोणी ओळखूही शकले नव्हते. कुणीतरी पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांनी जखमी अवस्थेतील अनुला ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केलं.. या अपघातानंतर अनु जवळपास 29 दिवस कोमात गेली. इतकेच नाही तर तिची स्मरणशक्तीही गेली.
सुदैवाने ती कोमातून बाहेर आली पण तोपर्यंत आयुष्य बदललं होतं. भूतकाळातील काहीही अनुला आठवेना. पुढे स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी अनु बिहार येथील मुंगेरस्थित प्रसिद्ध योग साधना केंद्रात गेली. स्मरणशक्ती पुन्हा मिळविण्यासाठी तिने कठीण योगसाधना केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अनुची स्मरणशक्ती पूर्वपदावर आली खरी. पण तोपर्यंत बराच काळ लोटला होता. या काळात बॉलिवूडमधील लोकांनाही तिचा विसर पडला होता.