Abhijeet Sawant : “-नाहीतर आयुष्य कधीच संपलं असतं...”, पहिला 'इंडियन आयडल' अभिजीत सावंतची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 10:51 AM2023-02-03T10:51:58+5:302023-02-03T10:53:06+5:30
Abhijeet Sawant : अभिजित सावंतने ‘इंडियन आयडल’ हा शो जिंकला आणि तो एका रात्रीत स्टार झाला. सध्या याच अभिजीत सावंतच्या एका पाेस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Abhijeet Sawant : २००४ हे साल. याचवर्षी ‘इंडियन आयडल’ (Indian Idol) हा सिंगींग रिॲलिटी शो आला. या शोमधल्या एका आवाजाने तेव्हा सर्वांनाच वेड लावलं होतं. हा आवाज होता अभिजीत सावंत याचा. होय, छोट्या पडद्यावरच्या सर्वाधिक गाजलेल्या ‘इंडियन आयडल’च्या पहिला पर्चाचा विजेता तोच हा अभिजीत सावंत. अभिजित सावंतने ‘इंडियन आयडल’ हा शो जिंकला आणि तो एका रात्रीत स्टार झाला. अर्थात बॉलिवूडचा खूप मोठा सिंगर वगैरे होण्याचं त्याचं स्वप्न स्वप्नचं राहिलं. बॉलिवूडमध्ये त्याला मोठा ब्रेक मिळू शकला नाही. सध्या याच अभिजीत सावंतच्या एका पाेस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिजीत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. सध्या त्याची एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. मी फक्त माझ्या स्वप्नांसाठी जगतोय. नाहीतर हे आयुष्य कधीच संपलं असतं..., अशा आशयाची स्टोरी त्याने शेअर केली आहे. जिंदा रहता हू मैं अपनी ख्वाहिशों के लिए... नहीं तो यह जिंदगी कमबख्त कब का मार डालती..., असं त्याने इन्स्टास्टोरीत लिहिलं आहे. आता त्याच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय हे मात्र त्यालाच ठाऊक.
याआधी एका मुलाखतीत अभिजीतने ‘इंडियन आयडल’चं पहिलं पर्व जिंकल्यानंतर आयुष्य कसं बदललं, ते सांगितलं हाेतं. “मी इंडियन आयडलचा विजेता ठरल्यानंतर लोकांनी मला भरभरून प्रेम दिलं. आजही अनेकजण त्याच उत्साहाने मला भेटतात इंडियन आयडल संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका मासिकाने त्यांच्या फ्रंट पेजवर मी शोमध्ये हेराफेरी केल्याची बातमी छापली होती. यानंतर काही दिवसांनी आणखी एक बातमी प्रसिद्ध झाली. ज्या बातमीचं हेडिंग होतं, अभिजीत सावंत झाला बेघर. आजही रोज माझ्या वाचनात येतं की मी कुठंतरी गायब झालोय, पण असं काहीही नाही. मी फक्त माझ्या डोक्यात हवा जाऊ दिली नाही,” असं तो म्हणाला होता.
2005 साली अभिजीत सावंतचा पहिला अल्बम 'आपका अभिजित सावंत' सर्वांसमोर आला. त्याच वर्षी त्यांने 'आशिक बनाया आपने' चित्रपटात पार्श्वगायन केले आणि 'मरजावा मिटजावा' गाणे गायले. 2007 साली त्याचा ‘जुनून’ हा दुसरा अल्बम आला. 'जो जीता वही सुपरस्टार' या रिॲलिटी शोचा तो फर्स्ट रनर अप होता. याशिवाय 'एशियन आयडल'मध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आला होता. असं असूनही त्याला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळू शकला नाही. स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. त्याला अभिजीत देखील अपवाद नाही.