'इंडियन आयडल - मराठी' लवकरच रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 04:18 PM2021-09-08T16:18:25+5:302021-09-08T16:25:17+5:30
इंडियन आयडॉल - मराठी' या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोचणार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहे.
'इंडियन आयडल' गाण्याच्या रिएलिटी शोने प्रचंड लोकप्रियता मिळवली. या शोचे प्रत्येक पर्व सुपरहिट ठरले. पहिल्या पर्वापासून सुरु झालेला हा प्रवास 12 पर्वापर्यंत पोहचला. प्रत्येक पर्व एकाहून एक सरस ठरला.'इंडियन आयडॉल'ची आत्तापर्यंत अनेक पर्वं झाली आहेत, ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यातून देशाला अनेक कलाकारही मिळाले आहेत. देशाच्या कानाकोपर्यातून स्पर्धक या शोमध्ये सहभागी होण्यासाठी अनेकदा ऑडीशन देतात. यंदाचा १२ वा सिझनमध्ये दोन मराठी स्पर्धकांनी आपल्या गायकीने रसिकांची पसंती मिळवली होती. रोहिता राऊत आणि सायली कांबळे. या दोघांनीही एक से बढकर एक परफॉर्मन्स देत रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले.
या शोचा पहिला विजेताही मराठीच तो म्हणजे अभिजीत सावंत. आजही अभिजीत सावंत आपल्या गायकीने रसिकांना बेधुंद करत आहे. हिंदीमध्ये या शोला मिळालेली प्रचंड लोकप्रियता पाहता आता हा शो मराठीमध्येही येण्यासाठी सज्ज झाला आहे. इंडियन आयडलमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक स्पर्धकाचे स्वप्न असते. त्यामुळे आता मराठी स्पर्धकांसाठी हा मंच खास ठरणार आहे. नुकतेच या शोची घोषणा करण्यात आली आहे.
हिंदी प्रमाणे सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदाच 'इंडियन आयडॉल - मराठी' घेऊन येते आहे. 'इंडियन आयडॉल - मराठी'मुळे स्पर्धकांच्या कलागुणांना वाव मिळेल आणि प्रेक्षकांचं मनोरंजनही होईल.आता 'इंडियन आयडॉल - मराठी' या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोचणार आहे आणि आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांना 'इंडियन आयडॉल - मराठी' लवकरच पाहायला मिळणार आहे.
तसेही यापूर्वीही हिंदीमध्ये गाजलेले शो मराठीत सुरु करण्यात आले होते. 'कोण होणार करोडपती', 'बिग बॉस मराठी' सारखे रिएलिटी शोला देखील मराठी रसिकांकडून भरपूर पसंती मिळाली. हिंदी प्रमाणे मराठीतही या कार्यक्रमाचे पर्व सुरु असतात. त्यामुळे आता याच यादीत 'इंडियन आयडल मराठी'चीही भर पडणार हे मात्र नक्की. मराठीमध्ये इंडियन आयडल कितपत रसिकांची पसंती मिळवतो हेच पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.