सहाय्यक अभिनेता ते लीड हिरो, जाणून घ्या, मालिकाविश्व गाजवणाऱ्या 'या' नायकाचा प्रेरणादायी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 13:56 IST2024-02-28T13:54:17+5:302024-02-28T13:56:27+5:30
स्टार प्रवाहवरील सहकुटुंब सहपरिवार ही मालिका विशेष गाजली. या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतील प्रत्येक पात्राने चाहत्यांचा मनाचा ठाव घेतला.

सहाय्यक अभिनेता ते लीड हिरो, जाणून घ्या, मालिकाविश्व गाजवणाऱ्या 'या' नायकाचा प्रेरणादायी प्रवास
Marathi Serial : सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अंजी पश्याची जोडी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर करुन गेली. यातील पशाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आकाश नलावडेला या मालिकेत काम करुन खरी ओळख मिळाली. आपल्या साध्या, सरळ स्वभावाने पश्याने चाहत्यांची मने जिंकली. कुटुंबावर आतोनात प्रेम करणारा पशा अल्पवधीत प्रेक्षकांचा लाडका झाला. आज जरी ही मालिका संपली असली तरी आकाशने साकारलेल्या पश्या या व्यक्तिरेखेविषयी वाटणारा जिव्हाळा प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
लवकरच अभिनेता आकाश नलावडे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या 'साधी माणसं' या मालिकेत आकाश सत्या हे मुख्य नायकाचं पात्र साकारणार आहे. अभिनेत्री शिवानी बावकरसोबत तो स्क्रीन शेअर करणार आहे.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात अभिनेत्याने नाट्यशास्त्राची पदवी संपादन केली आहे. अनेक प्रयोगिक नाटकांमध्ये काम करून त्याने त्याच्या अभिनयाची चुणूक दाखवली. या आधी त्याने काही मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्याचं देखील काम केल्याचं सांगितलं जातं. त्याच दरम्यान आकाशला सहकुटुंब सहपरिवार या मालिकेसाठी विचारण्यात आलं. आता आकाश नव्या रुपात, नव्या ढंगात 'साधी माणसं' मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्याचा मालिकेतील लूक पूर्णपणे वेगळा आहे. आता 'साधी माणसं' मालिकेतील त्याची सत्याची भूमिका प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.