Interview : अभिनयाबरोबरच शिक्षणालाही महत्त्व द्यावे- आकृती शर्मा !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 07:03 AM2018-03-16T07:03:30+5:302018-03-16T12:42:37+5:30
-रवींद्र मोरे एका आगामी संगीतमय मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणारी बालकलाकार आकृती शर्माने आपल्या अभिनयाने, निरागस रूपाने आणि प्रभावी भावनाविष्काराने ...
एका आगामी संगीतमय मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणारी बालकलाकार आकृती शर्माने आपल्या अभिनयाने, निरागस रूपाने आणि प्रभावी भावनाविष्काराने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले आहे. या चिमुरड्या बालकलाकाराची प्रेरणा कोण आहे, तिचे करिअरविषयी काय मत आहे, शिवाय अभिनयासोबतच कशाला महत्त्व दिले पाहिजे याविषयी आकृतीशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा...
* या मालिकेतील तुझ्या भूमिके विषयी काय सांगशिल?
- या मालिकेत पठाणकोटजवळील मत्सुआ गावातील एका सात वर्षांच्या कुल्फी नावाच्या मुलीची कथा दाखविली असून कुल्फीची भूमिका मी साकारत आहे. यात अत्यंत सुरेल आणि गोड गळ्याची देणगी मला लाभलेली असून आपल्या गोड आवाजाने निराश किंवा दु:खी प्रसंगाचे रूपांतर नेहमीच आनंद आणि सकारात्मक वातावरणात करते असे दाखवण्यात येणार आहे. शिवाय मला अतिशय आनंदी, स्वच्छंदी, मिश्किल आणि निरागस स्वभावाची, सदा हसतमुख असणारी मुलगी दाखविण्यात आली आहे. आपल्या आवडत्या सलवार-कुर्ता, स्पोर्टस शूज आणि केसांची छानशी बांधलेली पोनी टेल अशा लूकमध्ये मी आपल्या गावातील गल्लीबोळांतून नव्या गोष्टींचा शोध घेत फिरताना दिसणार आहे.
* शूटिंगचा अनुभव कसा वाटला?
- शूटिंग करताना खूपच मजा आली. त्याठिकाणी स्ट्रॉबेरी उपलब्ध असल्याने मनसोक्त स्ट्रॉबेरीदेखील खाल्ली. तसेच अॅक्टिंगदेखील खूपच आवडीने केली. अॅक्टिंगदरम्यान वेळ मिळायचा तेव्हा अभ्यासपण करायची. मी लहान असल्याने मला सर्वचजण समजून घेऊन माझे खूपच लाड देखील केले. मी त्याठिकाणी खूपच आनंदी होती.
* अभिनय क्षेत्रात तुझे प्रेरणास्थान कोण आहे?
- मला माधुरी दीक्षित खूपच आवडतात. माझ्यासाठी प्रेरणास्थानही माधुरी दीक्षितच आहेत. मी त्यांचे नृत्ये, अभिनय वारंवार पाहत असते. याचाच उपयोग मला माझी भूमिका साकारण्यासाठी होतो. शिवाय त्यांच्यामुळेच माझ्यात अभिनय आणि नृत्याची आवड निर्माण झाली. मला मोठेपणी त्यांच्या इतकीच उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना व्हायचे असून एक दिवस मला त्यांना भेटायचेही आहे.
* तुझ्या भविष्यातील करिअरविषयी काय सांगशिल?
- मला अॅक्टिंग, डान्स, मॉडेलिंग, सिंगिंग आदी सर्वच क्षेत्रात खूप मोठे नाव कमवायचे आहे. त्यातच एक उत्तम कलाकार म्हणूनही ओळख निर्माण करायची आहे. आज ज्याप्रकारे माधुरी दीक्षित, हेमा मालिनी यांचे नाव घेतले जाते त्याच प्रकारचे नाव कमवून या क्षेत्रात आगळी वेगळी छाप निर्माण करायची आहे.
* नवोदित बाल कलाकारांना काय संदेश देशिल?
- या क्षेत्रात खूपच स्पर्धा आहे, मात्र खूप मेहनत घेतल्यास शिवाय मन लावून काम केल्यास यश हमखास मिळते. मात्र अभिनयाबरोबरच शिक्षणालाही महत्त्व द्यायला हवे. कारण या क्षेत्रात स्वत:ला अपटेडे ठेवणे खूपच आवश्यक असते.
Also Read : कुल्फी कुमार बाजेवाला या मालिकेसाठी आकृती शर्माने एका आठवड्यात पाठ केली आठ गाणी