Interview : जिद्द व चिकाटी असल्यास 'विनर' होणे शक्य- बिशाल शर्मा !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 11:14 AM2018-03-27T11:14:27+5:302018-03-27T16:54:15+5:30
-रवींद्र मोरे आयुष्यात ध्येय, चिकाटी आणि कुटुंबाची साथ असल्यास आपण कोणत्याही स्पर्धेत विनर होऊ शकतो, असे मत 'सुपर डांसर ...
आयुष्यात ध्येय, चिकाटी आणि कुटुंबाची साथ असल्यास आपण कोणत्याही स्पर्धेत विनर होऊ शकतो, असे मत 'सुपर डांसर 2' च्या ग्रॅँड फिनाले मध्ये विनर झालेला आसाम येथील बारा वर्षीय बिशाल शर्मा याने व्यक्त केले. अत्यंत हलाखीची परिस्थितीवर मात करत बिशालने विनर होऊन एक आदर्श निर्माण केला. त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासाबाबत 'सीएनएक्स'ने त्याच्याशी मारलेल्या मनसोक्त गप्पा...
* इथपर्यंतचा तुझा प्रवास कसा राहिला?
- इथपर्यंतचा प्रवास तसा खूपच चांगला होता. तशी इथपर्यंत येण्यासाठी खूपच मेहनत करावी लागली, मात्र बरेच काही शिकायलाही मिळाले, आणि हिच शिकवण मला आयुष्यात खूप मोठे बनण्यास मदतही करेल.
* विनर झाल्यानंतर तुला कसे वाटत आहे?
- मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मी विनर होईल आणि एक करोड वीस लाख वोट मिळतील. विनर झाल्यानंतर खूपच चांगले वाटत असून आत्मविश्वासदेखील वाढला आहे. गेल्या वेळी मेगा आॅडिशनलाही आलो होतो मात्र आऊट झालो होतो. शिवाय वडिलांचे पैसेही जास्त खर्च झाले होते. त्यामुळे सीझन २ मध्ये येण्यासाठी एवढे पैसेही नव्हते. मात्र माझी जिद्द आणि चिकाटी पाहून आमच्या सर्वांची लाडकी गाय वडिलांनी पैशांसाठी विकली आणि त्यानंतर सीझन २ मध्ये आलो. सीझन २ मध्ये आल्यानंतर माझ्या तीन इच्छा होत्या, पहिली म्हणजे सुपर डिझरमध्ये टीव्हीवर परफॉर्म्स करणे, दुसरी गेलेली गाय पुन्हा वापस आणणे आणि तिसरी म्हणजे या शोचा विनर होणे. केलेल्या परफॉर्म्समुळे माझ्या तीनही इच्छा पूर्ण झाल्यात.
* या शोचे जजेस शिल्पा शेट्टी, अनुराग बसु आणि गिता कपूर यांनी तुला काय मदत केली आणि त्यांच्याकडून तुला काय शिकायला मिळाले?
- शिल्पा मॅम, अनुराग सर आणि गिता मॅम यांनी आमची गाय परत मिळवून दिली. मी जर भविष्यात खूप मोठा झालो आणि असाच एखादा शो जज करण्यास मिळाला तर मी या तिघांसारखाच जज करण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे मला त्यांच्यासारखेच मोठे व्हायचे आहे.
* भविष्यात करिअरच्या बाबतीत काय विचार केला आहे?
- मला भविष्यात एक सुपर हिरो बनायचे आहे, शिवाय माझ्या आई-वडिलांसाठी एक मोठे घर बांधायचे आहे आणि आम्हा सर्वांचे बॉडिगार्डदेखील असावेत. तसेच मला गरीबांसाठीही घरे बांधायचे असून त्यांना सर्वतोपरी मदत करु इच्छितो. डान्सर आणि कोरिओग्राफर क्षेत्रात मला करिअर करायचे असून त्यात मोठे नाव करायचे आहे.
* या क्षेत्रात येणाऱ्या नवोदित कलाकारांना काय संदेश देशिल?
- अगोदर ध्येय निश्चित करावे आणि त्यानंतर ते ध्येयपुर्तीसाठी खूप मेहनत घ्यावी. या क्षेत्रात येणाऱ्याना माझ्याकडून आॅल द बेस्ट.