आई कुठे काय करते: इशा-साहीलचा होणार ब्रेकअप; अरुंधती-अनिरुद्ध ठरणार कारणीभूत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 14:41 IST2022-05-24T14:40:17+5:302022-05-24T14:41:11+5:30
Aai kuthe kay karte: अरुंधती आणि अनिरुद्ध या जोडीचा घटस्फोट झाल्यानंतर देशमुख कुटुंबात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. इतकंच नाही तर अरुंधतीच्या मुलांच्या भविष्यावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे.

आई कुठे काय करते: इशा-साहीलचा होणार ब्रेकअप; अरुंधती-अनिरुद्ध ठरणार कारणीभूत?
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक आगामी भागाविषयी जाणून घेण्याची नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता असते. अरुंधती आणि अनिरुद्ध या जोडीचा घटस्फोट झाल्यानंतर देशमुख कुटुंबात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. इतकंच नाही तर अरुंधतीच्या मुलांच्या भविष्यावरही त्याचा परिणाम होताना दिसत आहे. यामध्येच आता इशा आणि साहिल यांचा ब्रेकअप होणार असल्याचं दिसून येत आहे.
अरुंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब विखरलं आहे. अभि-अनघाच्या संसारात सातत्याने वाद होत आहेत. यश-गौरी यांच्यातही मतभेद निर्माण होत आहेत. इतकंच नाही तर आता इशा आणि साहील यांच्या नात्यातही दुरावा येणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
साहीलसाठी जीव द्यायला निघालेल्या इशाची समजूत काढून अरुंधतीने आपल्या मुलीला चांगल्या मार्गावर आणलं होतं. इतकंच नाही तर साहीलसोबतही चर्चा केल्यानंतर त्याच्यातील चांगुलपणा तिला जाणवला होता. म्हणूनच, साहीलला मारायला निघालेल्या अनिरुद्धला अरुंधतीने थांबवलं होतं. परिणामी, अरुंधतीचा हाच चांगुलपणा पाहून साहीलचं मत परिवर्तन झालं आणि तो खऱ्या अर्थाने इशावर प्रेम करु लागला. परंतु, आता अरुंधती घर सोडून गेल्यानंतर साहीलदेखील इशाला सोडणार असल्याचं दिसून येत आहे. याविषयी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, एकीकडे अरुंधती तिच्या आयुष्यात पुढे जात आहे. तर, देशमुख कुटुंबासोबत ती नसल्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती एकाकी पडली आहे. प्रत्येकाच्या जीवनाची घडी विस्कटली आहे. त्यामुळे मालिकेत येणाऱ्या या रंजकदार वळणामुळे या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, आता अरुंधती, इशा आणि साहीलचं नातं वाचवू शकेल का? हे येत्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे.