#MeTooच्या प्रश्नावर सुरभि चंदनाने दिली ही प्रतिक्रिया, म्हणाली.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 15:43 IST2018-10-20T15:41:21+5:302018-10-20T15:43:48+5:30
चित्रपटसृष्टीतील दिग्गजांकडून कास्टिंग काऊच किंवा लैंगिक शोषण झाल्याचा आरोप अनेक अभिनेत्रींनी केला आहे. सोशल मीडियावर #metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती.

#MeTooच्या प्रश्नावर सुरभि चंदनाने दिली ही प्रतिक्रिया, म्हणाली.....
सध्या देशभरात #MeToo चं वादळ घोंगावतंय. चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अनेक महिला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडत आहेत. दिवसागणिक कोणत्या ना कोणत्या आरोपांनी चित्रपटसृष्टी हादरत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘इश्कबाझ’ मालिकेत अन्निकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरभि चंदनानेही #Metoo वर सोशल मीडियावर तिचे मत व्यक्त केले आहे.
या चळवळीच्या प्रभावामुळे अधिकाधिक महिला आपल्यावरील अशा प्रसंगांना वाचा फोडत असून त्यंनी हे काम पुढेही सुरू ठेवावे, अशी अपेक्षा सुरभिने व्यक्त केली आहे. “टीव्हीवरील कलाकारांची एक प्रतिनिधी या नात्याने मी महिलांना आवाहन करते की त्यांनी आपल्यावर झालेल्या अशा अन्याय-अत्याचारांच्या प्रसंगांना वाचा फोडावी आणि त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला सार््या जगापुढे आणावे. आपल्या मनाच्या खोल कप्प्यात साठवून ठेवलेल्या अशा अन्यायाला महिलांनी उघड करावं, यासाठी मी त्यांना मदत करीन.
नोकरीनिमित्त अनेक महिला घराबाहेर पडतात. अशा परिस्थितीत कामाच्या ठिकाणी त्या महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं आणि त्यांचा मान सन्मान आदर राखला गेलाच पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. आपल्याबरोबर काम करणा-या व्यक्तीकडून होत असलेल्या अशा लैंगिक छळाला मूकपणे सहन करण्याची आता गरज उरलेली नाही.”
चित्रपट क्षेत्रातील काही महिलांनी या मोहिमेचा प्रारंभ केल्यपासून ही चळवळ आता भारतभर पसरली असून ती सर्व क्षेत्रांमध्ये पसरत चालली आहे. अधिकाधिक महिलांनी आपल्यावरील अन्यायाच्या प्रसंगांना या चळवळीच्या माध्यमातून वाचा फोडावी, असे सुरभिचे मत आहे. या महिला या लढ्यात एकट्या नाहीत, असेही ती सांगते.
हिंदी चित्रपटसृष्टीत दिवसागणिक लैगिक अत्याचार आणि शोषणाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिंटाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सिंटा एक महिलांची समिती गठीत करणार आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. या समितीमध्ये अभिनेत्री रवीना टंडन, रेणुका शहाणे, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल. या तीन अभिनेत्रींसह दिग्दर्शक-अभिनेता अमोल गुप्ते, पत्रकार भारती दुबे, वकील वृंदा ग्रोवहर आणि मानसोपचारतज्ज्ञ यांचाही या समितीत समावेश असेल. या समितीबाबत चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तींशी सल्लामसलत सुरू असल्याची माहिती सिंटाचे सरचिटणीस सुशांत सिंहने दिली आहे. लवकरच या समितीचे गठन करण्यात येणार आहे. या संदर्भात अभिनेत्री स्वरा भास्करने या संदर्भात आपल्याशी चर्चा केली असल्याची माहितीही सुशांत सिंहने दिली आहे.