चांगलं काम करत राहणं हेच महत्त्वाचं- अदिती देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 06:51 PM2018-09-08T18:51:26+5:302018-09-08T18:52:55+5:30
अदिती देशपांडे यांनी हिंदी शोजकडे वाटचाल सुरू केली आहे. अगोदर एका हिंदी शोमध्ये काम केल्यानंतर अदिती पुन्हा एकदा ‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो..’ या नव्या हिंदी शोजमध्ये सासूची भूमिका साकारत आहेत.
-रवींद्र मोरे
दशक्रिया, वजनदार, जोगवा, पक पक पकाक आदी मराठी चित्रपटात दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी अदिती देशपांडे यांनी हिंदी शोजकडे वाटचाल सुरू केली आहे. अगोदर एका हिंदी शोमध्ये काम केल्यानंतर अदिती पुन्हा एकदा ‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो..’ या नव्या हिंदी शोजमध्ये सासूची भूमिका साकारत आहेत. एकंदरीत त्यांच्या यातील भूमिकेबाबत आणि अभिनय प्रवासाबाबत सीएनएक्सने घेतलेला हा वृत्तांत...!
* या शोमधील आपल्या भूमिकेबद्दल सांगा?
- या शो मध्ये जो नायक आहे समर, त्याच्या आईची म्हणजेच रमाची भूमिका मी साकारत आहे. यात मी माझ्या आयुष्यात अतिशय सुखी असून माझे एक संस्कारी कुटुंब आहे. शिवाय मी यात सर्वांना एकत्रित करुन ठेवले आहे. दुसरीकडे एका दु:खी आईची मुलगी माझ्या मुलाच्या प्रेमात पडते आणि त्याच्याशी लग्नही करते. मात्र तिनेही माझ्यासारखेच सुखी कुटुंबाचा एक भाग व्हावे, आणि सर्वांना एकत्र सांभाळून ठेवावे अशी माझी अपेक्षा. मात्र तसे न करता थोडथोड्या गोष्टींवर काहीही किरकोळ भांडण झाले की ती सांगते, मी माहेरी जाते. तिने असे न करता या फॅमिलीला आपलेसे मानावे हे समजवण्याची माझी यात सकारात्मकतेची भूमिका आहे.
* या शोचे शीर्षक ‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो..’ या गाण्यावर आधारित आहे, आपणास कसे वाटते?
- व्यक्तिगत मत जर सांगायचे झाले तर, लग्नानंतर कधी कुणाचे माहेर सुटत नाही. रमाची भूमिका साकारताना विचार केला तर बºयाचदा सासुला आई म्हणण्याचा आग्रह केला जातो. म्हणून आई म्हणावे म्हणून नुसते आई म्हणू नका. मनापासून सासुला आई म्हणा. मात्र बºयाचदा संसारात थोडं काही झालं की, आईला सांगितले जाते. प्रत्येकाच्या आयुष्यात थोडेफार वाद होतातच, मात्र सासरच्या मंडळींसोबत बसून ते वाद सोडविले तर बरेच प्रश्न जागेवरच सुटतात. मात्र सध्याच्या यंग जनरेशनमध्ये खूपच इगो दिसून येतो. थोडे काही झाले की, वेगवेगळे होतात. रोजच मारहाण केली जात असेल तर ते लग्न नकोच. मात्र अगोदरचे लोकं आजन्म सोबत राहायचे. सामंजस्याची भूमिका घेतली तर सर्वकाही ठिक होते.
* तुम्ही कधी आपल्या पतीशी नाराज होऊन माहेरी गेल्या आहेत?
- (हसून) हो, एकदा गेली होती. खूप काही गंभीर समस्या नव्हती. लग्नाच्या १५ वर्षानंतर काहीतरी झाले होते. मग वैतागून रात्री १०.३० वाजता माहेरी निघून गेली होती. मात्र अवघ्या तासाभरातच पतीला फोन करुन मला घ्यायला बोलवून घेतले होते. त्यावेळी माझा मुलगाही सोबत होता. लग्नाच्या सुरुवातीला खूपच माहेरी जावेसे वाटायचे, मात्र पतीने एवढे अॅडजस्ट केले तर आपणही अॅडजस्ट करावे, अशी लग्नापासूनच धारणा करुन घेतली आहे. सुदैवाने आमच्या आयुष्यात त्या पद्धतीचे वाद होत नव्हते. मी सर्वांनाच आपलेसे मानायची म्हणून वारंवार तशी वेळ माझ्यावर आली नाही.
* हिंदी आणि मराठी शोजमध्ये आपणास काय फरक जाणवतो?
- इतके वर्ष मराठी मध्ये काम केले आहे, त्यामुळे एका फॅमिलीसारखे वातावरण तयार झाले आहे. शिवाय हिंदी मध्येही एका शोमध्ये काम केले आहे. फरकचा विचार केला तर फक्त कॅन्व्हॉसचा फरक जाणवला. हिंदीमध्ये दिसण्याला, म्हणजेच ज्वेलरी, मेकअप, ड्रेसअप आदी गोष्टींचा जास्त बाऊ केला जातो. तसे पाहिले तर मराठीतही दिसून येते, मात्र कमी प्रमाणात. हिंदीमध्ये काम करताना इगोची भीति वाटायची, मला याबाबत टेन्शनही आले होते. मात्र तिथे काम केल्यानंतर अनुभव आला की, हे सर्व आपल्या मानसिकतेवर अवलंबुन असते. त्याठिकाणीही फॅमिलीसारखाच अनुभव आला. एकंदरीत चांगले काम करत राहणे हे महत्त्वाचे, मग हिंदी असो वा मराठी.
* या शोमध्ये आपण एक चांगल्या सासू बनल्या आहेत, चांगली सून बनण्यासाठी काही टिप्स?
- माझं लग्न झाले तेव्हा मी खूप यंग होते. विशेषत: लग्नासाठी तयार असेल तरच मुलीने लग्न करावे. सासुच्या घरी जाताना सून म्हणून नव्हे तर एक मुलगी म्हणून जावे. कुटुंब फक्त नवरा, सासू आणि सासरे एवढेच नसून त्यांच्याशी संबंधीत सर्व नातेवाईकांना आपलेसे मानावे. एकंदरीत सर्वांनाच सोबत घेऊन चालणे हेच चांगल्या सुनेचे लक्षण होय.
* एखादा मराठी इंडस्ट्रीचा अॅक्टर ज्याने आपल्या या शोच्या प्रोमोला पाहिले असेल आणि प्रशंसा केली असेल?
- अशोक सराफ, अविनाश नाडकर, शिल्पा तुळसकर आदी या शोचा प्रोमो पाहिला. त्यांना खूपच वेगळी थीम वाटली. शिवाय या शोच्या माध्यमातून काहीतरी वेगळे करतेय म्हणून खूप कौतुकही केले.
* शोमध्ये तुमच्या मुलाची पत्नी सासरी जाण्याची गोष्ट करते, जर रिअल लाइफमध्ये असे घडले तर आपल्या मुलाला काय टिप्स द्याल तुमच्या सुनेला समजवण्यासाठी?
- मी मुलाला सांगेल की, तिला माझ्यासाठी थोडा वेळ दे. माझ्या सान्निध्यात राहू दे. कारण मी तिला चांगले समजावू शके ल. तिला काय वाटते, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करेल. मला काय वाटते हे महत्त्वाचे नसून तिला समजून घेईल. जर तिला वेगळे राहायचे असेल तर मी दोघांना मी कधीही प्रेशर करणार नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र देईल. शिवाय रितीरिवाजांमध्येही अडकवणार नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांना जगण्यास मोकळीकता देईल.
* निलू वाघेला सोबतचा अनुभव कसा होता?
- फारच छान अनुभव आहे. निलू आणि मी अगोदरही एका शोमध्ये एकत्र काम केले आहे. आॅनस्क्रीन सोबतच आॅफस्क्रीनही आम्ही खूप मौजमस्ती केली आहे. शिवाय दोघांना कामाचा अनुभवदेखील सारखाच आहे. त्यामुळे दोघांची विचारसरणीबरोबरच मॅच्युअर अंडरस्टॅँडिंगदेखील खूपच छान आहे.