"१५ वर्षे झाली तिला जाऊन, पण...", आईच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 01:37 PM2024-06-21T13:37:46+5:302024-06-21T13:38:31+5:30

Milind Gawali : अभिनेता मिलिंद गवळींनी आईच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

"It's been 15 years since she left, but...", Milind Gawli's special post on the occasion of mother's birthday | "१५ वर्षे झाली तिला जाऊन, पण...", आईच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट

"१५ वर्षे झाली तिला जाऊन, पण...", आईच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट

अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali) मराठी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या ते 'आई कुठे काय करते' मालिकेत काम करताना दिसत आहेत. या मालिकेत त्याने साकारलेला अनिरुद्ध रसिकांना चांगलाच भावला आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रीय असतात आणि बऱ्याचदा पोस्ट शेअर करताना दिसतात. दरम्यान आता त्यांनी आईच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर आईसोबतच्या फोटोंचा कोलाज व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मम्मा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. २१ जून हा माझ्या आईचा वाढदिवस, वाढदिवस हा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस, पण तो स्वतःचा नाही तर इतरांचा वाढदिवस हा तिच्यासाठी दिवाळी दसऱ्याप्रमाणे असायचा, ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल त्या दिवशी ती इतकं काय काय करायची, गोडाचं जेवण तर असायचंच, ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल त्याच्यासाठी फुलं आणणं, केक आणणे, त्याच्यासाठी एखादा छानसा नवीन ड्रेस, शर्ट ,टी-शर्ट, साडी आणि त्या व्यक्तीला ते नवीन कपडे घालायलाच लावायची ती, तिचं म्हणणं होतं की वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकाने अंगावर नवीन कपडे घालणं आवश्यकच आहे, त्या व्यक्तीला नको, नाही म्हणणं शक्यच व्हायचं नाही, अनेकांनी तिची आठवण म्हणून तिने दिलेले कपडे अजूनही जपून ठेवले आहेत.

त्यांनी पुढे म्हटले की, बरं वाढदिवस एखाद्या गरीबाचा असो की श्रीमंताचा प्रत्येकासाठी ती तो सेलिब्रेट करायची, आणि अतिशय सुगरण असल्यामुळे कुठलीही गोष्ट साजरी करायची असेल तर त्याच्यासाठी गोडधोड हे केलेच पाहिजे अशी तिची धारणा होती. श्रीखंड पुरी बासुंदी पुरी पुरणपोळी साजूक तुपातला शिरा, व दादरच्या छेडा मधून पेढे बर्फी लाडू रसमलई गुलाबजाम कधीतरी रसगुल्ले , यातल्या दोन-चार मिठाया तर असायलाच पाहिजे, आणि ताटात फोडणीचं वरण भात, फोडणीचा भात तीन चार भाज्या चटणी पापड लोणची कोशिंबीर, आणि तिचा आग्रहं, तिच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तिचा आग्रह कसा होता हे चांगलं ठाऊक होते, चार पोळ्या खाणारा, दुसऱ्या पोळीलाच नाही नाही म्हणायला सुरुवात करायचा आणि सहा सात पोळ्या त्याला खाव्या लागायच्याच, पोटभरेपर्यंत आग्रह करणारे खूप आहेत पण एखाद्याचं मन भरेपर्यंत कसा आग्रह करायचा हे तिलाच ठाऊक होतं, तिच्या वाढदिवसाच्या दिवशी ती सांताक्रुझच्या एका अनाथाश्रमामध्ये धान्य आणि आवश्यक वस्तू वाटण्यासाठी आम्हाला घेऊन जायची.

अभिनेते आईला करताहेत मिस

माझ्या आईला मी खूप मिस करतो,पंधरा वर्षे झाली तिला जाऊन, पण गेली पंधरा वर्ष ती शरीराने जरी आमच्यात नसली तरी माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडत असतं त्यात तिचा हात आहे असं मला सारखं वाटतं, ती गेल्यानंतर मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही असं मी ठरवलं होतं, पण कोणाच्यातरी रूपात ती येऊन, अगदी लहान मुलासारखा माझा वाढदिवस साजरा करत असते, असे त्यांनी म्हटले.

Web Title: "It's been 15 years since she left, but...", Milind Gawli's special post on the occasion of mother's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.