धनश्री काडगावकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर, दुर्गामातेच्या भूमिकेत झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 12:23 PM2021-10-05T12:23:51+5:302021-10-05T12:24:24+5:30
धनश्री काडगावकर मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे तिची उत्सुकता शिघेला पोहोचली आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत बघण्याची तितकीच उत्सुकता आहे.
छोट्या पडद्यावरील नंदिता वहिनी ही व्यक्तीरेखा साकारत रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. विविध नाटक आणि चित्रपटातही धनश्रीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. धनश्री सोशल मीडियावरही बरीच एक्टिव्ह असते. आपले फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.काही महिन्यांपूर्वीच धनश्रीने बाळाला जन्म दिला होता. बाळाच्या जन्मानंतर ती बाळाची काळजी घेण्यात व्यस्त होती. आता मोठ्या ब्रेकनंतर धनश्री रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजीकडून किंवा आईकडून 'एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता' या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. या कार्यक्रमात नवरात्री विशेष भागात धनश्री काडगावकर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. धनश्रीने या आधी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत पण आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
धनश्री मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे तिची उत्सुकता शिघेला पोहोचली आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत बघण्याची तितकीच उत्सुकता आहे.या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, "माझ्या मुलाच्या जन्मानंतर खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावताना माझा अभिनयापासून संपर्क तुटला. मध्ये मोठा गॅप आल्यामुळे मला पुन्हा काम करता येईल कि नाही, मी काही विसरली तर नाही ना अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या.
पण मला माझ्या कुटुंबाकडून आणि या मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं. 'घेतला वसा टाकू नको' असं मी माझ्या मनाशी पक्क करून हि भूमिका स्वीकारली. या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते."