'कठीण असतंय एका कलाकाराबरोबर संसार करणं आणि...', मिलिंद गवळींनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली स्पेशल पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:28 PM2023-05-26T12:28:09+5:302023-05-26T12:28:34+5:30
Milind Gawali : मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे लग्नापासूनचे आतापर्यंतचे फोटो शेअर आहेत आणि पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रं घराघरात पोहचली आहे. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी साकारली आहे. ते सोशल मीडियावर सक्रीय असून पोस्ट शेअर करत असतात. दरम्यान, आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस असून यानिमित्ताने स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर पत्नीसोबतचे लग्नापासूनचे आतापर्यंतचे फोटो शेअर आहेत आणि पोस्टमध्ये लिहिले की, दिपा आणि माझा आज लग्नाच्या वाढदिवस. तीन दशकाहून अधिक काळ अशा माणसाबरोबर संसार केला जो गावोगावी जाऊन डोंबाऱ्याच्या खेळा सारखा सिनेमा , सिरीयल चा खेळ करतो आहे , आणि बऱ्याच वेळेला महिने महिने काम करून सुद्धा घरी येताना संसार चालवण्यासाठी काहीच पैसे घरी घेऊन आलेलो नसायचो, बरेचसे प्रोड्युसर मला माझे ठरलेले पैसे सुद्धा द्यायचे नाहीत, आणि आपल्या हक्काचे पैसे मागायची आजही मला सवय नाही आहे, हा संसाराचा गाडा कसा पुढे ढकला असेल , हे खरतर दिपालाच ठाऊक, पण कधी एका शब्दांनी विचारलं नाही , कधी कुरकुर केले नाही, का कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही, ऊलट काटकसर करायची सवय च लाऊन घेतली, इतकी सवय लागली की आजही पार्टी करायची म्हटली तरी सुद्धा एखादी भेळ, किंवा पाणीपुरी खाल्ली ही समाधान मानते ती.
ते पुढे म्हणाले की, अगदीच आजही कधी तरी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आम्ही जेवलोच तरी एखादं दहा-पंधरा रुपयाचं चोकोबार आईस्क्रीम खाल्लं की मगच चैन वगरे केल्यासारखं वाटतं तिला. आहे त्या परिस्थितीत खूप समाधानी राहायचं हे तिच्याकडून शिकण्यासारखा आहे. कठीण असतंय एका कलाकाराबरोबर संसार करणं, आणि तो कलाकार जर यशस्वी नसेल तर, संसाराचा गाडा पुढे ढकलत राहणार फारच कठीण होत जातं... काम नसायचं त्यावेळेला लोकं मुद्दामून अडूनाडून विचारायची की “काय मग आता घरीच आहेस का ?”, “शूटिंग वगैरे नाही का?” पण त्या काळातही दिपाने मला कधीही जाणव करून दिलं नाही, की मी एक flop Actor आहे , का माझ्याकडे काही काम नाही आहे किंवा मला कोणीही काम देत नाही आहे, बरं मला माझ्या आई-वडिलांनी राजेशाही पद्धतीने वाढवलं असल्यामुळे, स्वतः जाऊन काम मागायची मला सवयच नव्हती, त्यामुळे महिने महिने काहीही काम मिळायचं नाही, सातारा कोल्हापूरचे पिक्चर यायचे त्यात पैसे अगदीच कमी मिळायचे.
या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये घर सांभाळायचं, नातेवाईक सांभाळायचे, मिथीलाची तर संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी फक्त दिपा नेच घेतली होती, सकारात्मक विचार आणि परमेश्वरावर अपार श्रद्धा. आमच्या लग्नाचा वाढदिवस आला की मला जाणवतं की इतकी वर्ष या माऊलीने माझ्या बरोबर किती आनंदाने हा संसार केला, खूप खडतर प्रवास केला आणि आजही करते आहे , तिचे जितके आभार मानू इतके कमी आहेत. दिपा तुला ही आपल्या ३३ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.