आजोबा अन् टॅटू...! ‘जीव माझा गुंतला’च्या ‘मल्हार’ची ही पोस्ट वाचून तुम्ही कराल त्याचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 05:13 PM2021-12-14T17:13:08+5:302021-12-14T17:17:09+5:30
Jeev Majha Guntala, Saorabh Chaugule: होय, सौरभने त्याच्या हातावरच्या टॅटू मागची कहाणी सांगणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.
कलर्स मराठी वाहिनीवर ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Majha Guntala) या मालिकेच्या कथेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. मालिकेतील मल्हार आणि अंतरामधील नोकझोक प्रेक्षकांना प्रचंड भावतेय. मल्हारची भूमिका तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलीये. ही भूमिका साकारलीय ती अभिनेता सौरभ चौगुले (Saorabh Chaugule) याने. तूर्तास मात्र सौरभच्या टॅटूची चर्चा आहे. होय, सौरभने त्याच्या हातावरच्या टॅटू मागची कहाणी सांगणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.
सौरभने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात एका बाजूला त्याच्या हातावरचा टॅटू आहे आणि बाजूला एक वयोवृद्ध व्यक्ती दिसतेय. ही वयोवृद्ध व्यक्ती कोण तर सौरभचे आजोबा. आजोबा आणि टॅटूचा काय संबंध असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही सौरभची ही पोस्ट वाचायलाच हवी.
तो लिहितो, ‘लोक नेहमी मला या टॅटूमागचे कारण विचारतात, म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे! आजोबा ! माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक! तुम्ही आमच्या सोबत नसला तरी तुमच्या शिकवणीने मला नेहमीच आधार दिला आहे. मला तुमची खरोखर आठवण येत नाही कारण, तुम्ही मला वाटलेले जीवनाचे धडे कायम माझ्यासोबत आहेत. जेव्हा जेव्हा माझ्याकडे कोणत्याही परिस्थितीची उत्तर नसतात तेव्हा मी माझ्या हातावरची तुमची स्वाक्षरी (टॅटू) पाहतो आणि मला जाणवते की तुम्ही माझा हात धरला आहे. त्याद्वारे मला मार्गदर्शन करत आहात. वाढदिवसाच्या शुभेच्छा आजोबा... तुमचा नातू...’
एकंदर काय तर सौरभने आजोबांच्या स्वाक्षरीचा टॅटू हातावर काढला आहे.
फारच कमी लोकांना हे माहिती आहे, की हा आपला लाडका कलाकार सौरभ चौगुले फक्त अभिनेताच नव्हे तर एक उच्चशिक्षित अभिनेता आहे. सौरभने इंजिनियरिंग केलं आहे. इंजिनियरिंगची पदवी घेऊनही फक्त आवड असल्याने त्यानेअभिनयाकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र हे यश त्याला सहजासहजी मिळालेलं नाहीय. त्यासाठी त्याने अनेक अडचणी पार केल्या आहेत. अनेक कष्ट त्याने घेतले आहेत. अभिनेत्याने रंगमंचापासून अभिनयाला सुरुवात केली होती. आणि आज तो एका मुख्य अभिनेत्याच्या रूपात पडद्यावर झळकत आहे.