'माझा बाप आहे तो, अपघातानंतर त्याने..'; जितेंद्र अन् संजय मोने यांच्यात आहे खास नातं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 10:50 AM2023-08-27T10:50:17+5:302023-08-27T10:50:57+5:30
Jitendra joshi: 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमामध्ये जितेंद्रने संजय मोनेंसोबत असलेल्या नात्याविषयी भाष्य केलं.
मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि गुणी अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी(jitendra joshi). दर्जेदार अभिनयशैलीच्या जोरावर जितेंद्रने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अलिकडेच त्याच्या 'गोदावरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे तो चर्चेत येत आहे. यामध्येच आता लवकरच तो खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला असून त्याने अभिनेता संजय मोने (sanjay mone) यांच्याविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये जितेंद्रला संजय मोने यांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यात संजय मोने त्याच्यावर नाराज असल्याचं दिसून येत आहे. जितेंद्र, संजय मोने यांचा वाढदिवस विसरला होता. रात्री खूप उशीरा आठवल्यानंतर त्याने संजय यांना फोन केला. हा किस्सा जितेंद्रने यावेळी शेअर केला. सोबतच 'तो माझा बाप आहे', असं ही म्हटलं.
"अख्खं जग माझ्यावर रुसेल पण काका नाही रुसणार एवढं घट्ट नातं आहे आमचं. काका माझ्यावर कधीच नाराज होऊ शकत नाही. माझा बाप आहे तो. माझ्या अपघातानंतर त्याने मला उभं केलंय रे. त्या घटनेनंतर त्याने मला मी हिरो असल्याची जाणीव करुन दिली. मी हिरो आहे हे त्याने माझ्यात रुजवलं. त्याच्याचमुळे मी पुन्हा पाय घट्ट रोवून उभा राहिलोय", असं जितेंद्र म्हणाला.
दरम्यान, जितेंद्र हा किस्सा सांगत असतानाच संजय मोने गपचूप खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर येतात. या मंचावर संजय मोने यांना पाहून जितेंद्र भावूक होतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.