'माझा आवाज, माझीच कविता, इतका निर्लज्जपणा...? जितेंद्र जोशी 'रील' प्रेमींवर भडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 12:33 PM2023-08-20T12:33:09+5:302023-08-20T12:34:17+5:30
जितेंद्र जोशी फक्त अभिनेता नाही तर गीतकारही आहे.
सध्या सोशल मीडियावर फक्त रील्सचा धुमाकूळ आहे. एखादं गाणं असो किंवा डायलॉग्स त्यावर रील झालंच पाहिजे. या रीलबाजवर मराठी अभिनेत्याने मात्र आक्षेप घेतलाय. त्याच्या आवाजातील कवितांवर रील्स केले म्हणून त्याचा संताप झालाय. सोशल मीडियावरुन त्याने ही नाराजी व्यक्त केली आहे. तो अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी (Jitendra Joshi).
जितेंद्र जोशी अभिनयासोबतच उत्तम कवीही आहे. अनेकदा कार्यक्रमांमध्ये तो कविता म्हणताना दिसतो. त्याच्या कवितेचे क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आपलाच आवाज आणि आपलीच कविता इतर लोक त्यांच्या रील्सवर ठेवतात हे काही त्याला रुचलेलं दिसत नाही. त्याने सोशल मीडियावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तो लिहितो, 'एखाद्या आवाजतली त्याचीच कविता स्वत:चा रील बनवण्यासाठी वापरताना त्या माणसाच्या नावाचा उल्लेख सुद्धा करु नये हे वाटण्याचा निर्लज्जपणा किंवा बेफिकिरी मधून येणारा उद्दामपणा कुठून येत असावा?'
सोशल मीडियावर अनेकदा श्रेय न देताच स्वत:च्याच ना वे गोष्टी शेअर केल्या जातात. परवानगी न घेता किंवा क्रेडिट न देता आवाज वापरला जातो. 'कानाला खडा' तसंच इतर काही कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करताना त्याने कविता ऐकवल्या आहेत. त्याच्या कवितांवर टाळ्यांचा कडकडाट झालाय. 'रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' ही त्याची कविता सध्या व्हायरल होत आहे. जितेंद्र जोशी फक्त अभिनेता नाही तर गीतकारही आहे. त्याने 'मुरांबा' सिनेमातील 'अगं ऐक ना' हे गाणं लिहिलं आहे. याशिवाय जत्रा सिनेमातील लोकप्रिय गाणं 'कोंबडी पळाली' हे गाणं जितेंद्रनेच लिहिलं आहे.