धक्कादायक! जीव वाचवण्यासाठी ‘जोधा अकबर’ फेम अभिनेत्याचा कापावा लागला पाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 11:20 AM2021-08-03T11:20:30+5:302021-08-03T11:22:16+5:30
कोरोना महामारीनं काम हिरावलं, आजारापणात पाय गमावला...! सांगताना भावूक झाला अभिनेता
‘जोधा अकबर’ (Jodha Akbar) या मालिकेतील अभिनेते लोकेंद्र सिंह राजावत (Lokendra Singh Rajawat) गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत आणि आता त्यांनी एक पाय गमावला आहे. होय, डायबिटीजमुळे त्यांचा एक पाय कापावा लागला आहे. लोकेंद्र यांच्या उजव्या पायात कॉर्न विकसीत झाला होता. हा संसर्ग इतका वाढला की, तो संपूर्ण शरीरात पसरला. अखेर लोकेंद्र यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी उजवा पाय कापण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे लोकेंद्र यांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. आता त्यांनी स्वत:चा एक पायदेखील गमावला.
‘जोधा अकबर’ या मालिकेत लोकेंद्र यांनी शमसुद्दीन अटागा खानची भूमिका साकारली होती. ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतही ते झळकले होते. अनुराग बासू दिग्दर्शित 'जग्गा जासूस' आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'मलाल' या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती.
ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत लोकेंद्र यांनी आपबीती सांगितली. ते म्हणाले, डायबिटीजकडे दुर्लक्ष करू नका, इतकंच मी सांगेल. मी खूप भोगलं. आता माझ्या हातात काहीही नाही. कोरोना महामारीआधीपर्यंत मी स्वत:च्या पायावर उभा होतो. काम करत होतो. पण कोरोना महामारीच्या काळात काम मिळणं बंद झालं. घरात आर्थिक समस्या सुरू झाल्यात. चिंता वाढली. याकाळात माझ्या उजव्या पायात कॉर्न विकसीत झाला आणि त्याचा संसर्ग माझ्या बोन मॅरोपर्यंत पसरला. काहीच दिवसांत शरीरभर संसर्ग झाला. जीव वाचवायचा तर पाय कापणं आवश्यक होतं. 5 तास शस्त्रक्रिया चालली.
मी 10 वर्षांपूर्वीच डायबिटीजला गंभीरपणे घेतलं असतं तर आज माझा पाय गुडघ्यापर्यंत कापावा लागला नसता. आम्हा अभिनेत्यांकडे वेळ नसतो. अनेकदा जेवणासाठीही वेळ नसतो. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मला सिन्टाच्या माध्यमातून मदत मिळाली. अनेक कलाकारांनी फोनवर माझी विचारपूस करून धीर दिला, असंही त्यांनी सांगितलं.