मिका सिंग आणि भोजपुरी स्पर्धक राधाची रंगली जुगलबंदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 02:09 PM2018-07-31T14:09:56+5:302018-08-01T06:00:00+5:30
‘दिल है हिंदुस्तानी-2’मध्ये नामवंत परीक्षक म्हणून सहभागी झालेला लोकप्रिय पंजाबी गायक मिका सिंग याची गाठ राधा श्रीवास्तव नावाच्या एका लखनवी स्पर्धकाशी पडली.
‘दिल है हिंदुस्तानी-2’मध्ये नामवंत परीक्षक म्हणून सहभागी झालेला लोकप्रिय पंजाबी गायक मिका सिंगची गाठ राधा श्रीवास्तव नावाच्या एका लखनवी स्पर्धकाशी पडली. या कार्यक्रमात जगभरातून सहभागी झालेल्या गुणी गायक- वादकांचा आविष्कार पाहण्यास तसेच गेल्या भागातील टॉप सहा स्पर्धकांबरोबर गाण्यासाठी तो या कार्यक्रमात सहभागी झाला होता. आपल्या ठेकेदार भोजपुरी गाण्यांबद्दल 19 वर्षांची राधा चांगलीच प्रसिध्द आहे. तिला भोजपुरी भाषा बोलता येत नसली, तरी ती त्या भाषेतील गाणी अस्खलितपणे गाऊ शकते. आपल्या अपवादात्मक उत्कृष्ट गायनामुळे पहिल्यापासूनच सर्वांचे लक्ष तिने वेधून घेतले आहे. या भागात ती गात असलेले ‘बेदर्दी राजा’ हे गीत ऐकून मिका सिंगला राहावले नाही आणि तोसुध्दा तिच्याबरोबर हे गाणे गाण्यासाठी मंचावर उतरला.
या भागावर राधा म्हणाली, “मी स्वत: मिकासरांची मोठी चाहती असून मला त्यांच्याबरोबर एक गाणं गायचं होतं. तो माझं प्रेरणास्थान असून अशा मोठ्या गायकाबरोबर गाण्याचं माझं स्वप्न पूर्ण केल्याबद्दल ‘दिल है हिंदुस्तानी-2’ची मी अतिशय आभारी आहे. माझ्याबरोबर गाण्याला त्यांनी मला साथ दिली आणि माझ्या आवाजात जादू आहे, अशी माझ्या गाण्याची स्तुती केली तेव्हा मला स्वर्ग दोन बोटंच उरला. भोजपुरी ही फार गोड भाषा असून या कार्यक्रमात जास्तीत जास्त स्पर्धकांनी भोजपुरी भाषेतील गाणी गावीत, अशी माझी इच्छा आहे.”
‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सरहद्दी पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअॅलिटी शो आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.