जुई गडकरीला झाला होता 'हा' गंभीर आजार, अनेक शो हातातून निसटले; म्हणते - "प्रचंड त्रास व्हायचा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 01:26 PM2024-02-06T13:26:16+5:302024-02-06T13:26:50+5:30
Jui Gadkari : जुई गडकरी पुढचं पाऊल मालिका संपल्यानंतर बिग बॉस शोमध्ये सहभागी झाली. त्यानंतर तिने एक दोन मालिकेत काम केले. मात्र याचदरम्यान तिच्या आयुष्यात एक नवं वादळ आलं. ते म्हणजे गंभीर आजाराचं.
'पुढचं पाऊल' मालिकेत कल्याणीच्या भूमिकेतून अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) घराघरात पोहचली आहे. या मालिकेशिवाय ती बऱ्याच मालिकेत झळकली आहे. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या सायलीच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. मात्र काही वर्षांपूर्वी जुई गंभीर आजाराचा सामना करत होती. त्यामुळे तिच्या हातून चांगल्या मालिकाही निसटल्या.
जुई गडकरी पुढचं पाऊल मालिका संपल्यानंतर बिग बॉस शोमध्ये सहभागी झाली. त्यानंतर तिने एक दोन मालिकेत काम केले. मात्र याचदरम्यान तिच्या आयुष्यात एक नवं वादळ आलं. ते म्हणजे गंभीर आजाराचं. याबद्दल तिने नुकतेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली की, यापूर्वी मला आजार झाला नव्हता. हे एक प्रकारचं मेन्यू कार्ड होतं. सुरूवातीला थायरॉईड ग्रंथी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं निदान झालं नाही. पिट्यूटरीमध्ये प्रोलॅक्टिन ट्यूमरचा त्रास होत होता. त्यात माझ्या मनक्याची भयंकर वाट लागली होती. काही दिवसानंतर मला रूमेटॉइड आर्थरायटिस असल्याचे निदान झाले. या आजारांबद्दल मला काहीच माहीत नव्हते.
या आजाराचं नाव ऐकून लोक घाबरतात...
या आजारादरम्यान जुईला होणाऱ्या त्रासाबद्दल तिने सांगितले. सुरूवातीला तिचं डोकं दुखायचं, मग वजन वाढलं. पिरेड्समध्ये अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर हळूहळू हे आजार समोर आले. या आजारांवर तिने जवळपास ८ ते ९ वर्षे उपचार घेतले. इतके औषधोपचार केल्यावर शेवटी रूमेटॉइड आर्थरायटिस या मूळ आजाराचे निदान झाले. या आजारात आपलीच रोगप्रतिकारकशक्ती आपल्या शरीरातील चांगल्या टिश्यूंचा घात करते. काही लोक रूमेटॉइड आर्थरायटिस हे नाव ऐकूनही घाबरतात, असे जुईने सांगितले.
''देवाचा वरदहस्त कायम पाठीशी होता...''
ती पुढे म्हणाली की, याउलट मी या आजाराचं नाव ऐकून घाबरले नाही. नेमका आजार काय झालाय याबद्दल तरी मला समजलं अशी भावना माझ्या मनात होती. या आजाराची औषधं खूप त्रासदायक असतात. त्यामुळे मी औषधे घेतली नाहीत. उलट मी माझी जीवनशैली बदलली. या सगळ्यात देवाचा वरदहस्त कायम पाठीशी होता. दोन महिन्यांपूर्वी माझे रिपोर्ट्स केले आणि माझे सगळे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आणि आधीपेक्षा छान आले. त्यामुळे माझ्या या आजारांपेक्षा आयुष्यात मी जास्त मोठे आहे. ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवते.
''मी ठरवलं आयुष्य जगायचं''
या काळात जुई गडकरीच्या हातातून अनेक शो हातातून निसटून गेले. त्याबद्दल अभिनेत्री सांगते की, माझ्या वयाच्या मुली सगळ्या गोष्टी करतात तर मी का नाही करू शकत, या गोष्टीचा विचार करून मला प्रचंड त्रास व्हायचा. अनेक बंधनं मला त्या काळात होती. पण एक वेळ अशी आली जेव्हा माझ्या मनात विचार आला की, डॉक्टरांचं ऐकायचं की आयुष्य जगायचं? त्यावेळी मी ठरवलं आयुष्य जगायचं.
या गंभीर आजारावर मात करत जुई गडकरीने ठरलं तर मग मालिकेतून कमबॅक केलं आणि सायलीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर सध्या ती अधिराज्य गाजवते आहे. इतकेच नाही तर टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे.