तब्बल ७ वर्षांनी पुन्हा एकत्र आली 'काहे दिया परदेस'ची जोडी, सायली संजीवने शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 09:30 IST2023-12-19T09:29:44+5:302023-12-19T09:30:23+5:30
मालिका संपल्यानंतर तब्बल ७ वर्षांनी सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.

तब्बल ७ वर्षांनी पुन्हा एकत्र आली 'काहे दिया परदेस'ची जोडी, सायली संजीवने शेअर केला फोटो
मराठीतील लोकप्रिय मालिका 'काहे दिया परदेस' आठवत असेलच. या मालिकेतून ऋषी सक्सेना (Rishi Saxena) आणि सायली संजीवची (Sayali Sanjeev) जोडी घराघरात पोहोचली होती. दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना प्रेमात पाडलं होतं. ही मालिका हिंदीतील 'दिया, बाती और हम' ची रिमेक होती. मालिका संपल्यानंतर तब्बल ७ वर्षांनी सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे. सायलीने सोशल मीडियावर एक छानसा फोटो शेअर करत माहिती दिली आहे.
'काहे दिया परदेस'ही झी मराठी वाहिनीवरील मालिका २८ मार्च २०१६ ते २३ सप्टेंबर २०१७ पर्यंत चालली. मुंबईची गौरी म्हणजेच सायली संजीव आणि उत्तर भारतीय शिव म्हणजेच ऋषी सक्सेना यांची ती कहाणी होती. प्रेक्षकांना त्यांची केमिस्ट्री भलतीच पसंतीस पडली होती. आता प्रेक्षकांची ही लाडकी जोडी पुन्हा एकत्र आली आहे. आगामी 'समसारा' सिनेमात दोघंही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचं शूट सुरु झाल्याची माहिती सायलीने शेअर केली आहे. तसंच तिने ऋषी सक्सेना सोबत फोटोही स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. यामध्ये दोघंही बीचवर उभे आहेत आणि मागे सूर्योदय होत आहे. '७ वर्षानंतर सोबत शूट' असं कॅप्शन तिने दिलं आहे.
'समसारा' या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे करत आहेत. गर्भवती भानवीच्या दैवी जुळ्या मुलांना नष्ट करण्याची इच्छा असलेला एक असुर तिच्यासमोर येतो आणि देव-असूर यांच्यात युद्ध सुरू होतं. त्यामुळे मृत्यूचा देव यम आणि जीवनाची देवी यमी यांची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.