कांचन अधिकारी सांगत आहेत ​प्रमोशनचे तंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2017 12:34 PM2017-04-26T12:34:28+5:302017-04-26T18:04:28+5:30

1913 साली राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट आला होता आणि आज आपल्या चित्रपटसृष्टीला 104 वर्षं झाली आहेत. या वर्षांमध्ये ...

The Kanchan officials are telling the technique of promotion | कांचन अधिकारी सांगत आहेत ​प्रमोशनचे तंत्र

कांचन अधिकारी सांगत आहेत ​प्रमोशनचे तंत्र

googlenewsNext
1913
साली राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट आला होता आणि आज आपल्या चित्रपटसृष्टीला 104 वर्षं झाली आहेत. या वर्षांमध्ये आपण चांगलीच प्रगती केली आहे. दरम्यानच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीत अनेक बदल घडले आहेत. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत प्रमोशनचे तंत्र हे पूर्णपणे बदलले आहे. या निमित्ताने यावर निर्माती कांचन अधिकारी यांनी केलेले भाष्य...

चित्रपट बनवल्यानंतर त्याचे प्रमोशन करणे हे अधिक महत्त्वाचे असते. प्रमोशन म्हणजे माझा चित्रपट येत आहे. पाहायला या असे लोकांना सांगणे. पूर्वी केवळ वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून प्रमोशन केले जात असे. पण आता या गोष्टी बदलल्या आहेत. पूर्वी चित्रपट प्रदर्शित व्हायच्या काही दिवस आधी आम्ही महाराष्ट्रभर दौरे करत असू. कलाकारांना घेऊन संपूर्ण महाराष्ट्र उलथापालथा घालत असू. खरे तर मुंबई, पूणे, कोल्हापूरच्या पुढे कलाकार यायाला तेव्हाही पाहात नसत आणि आजही पाहात नाहीत. त्यामुळे मुख्य कलाकाराचे चित्रीकरण कुठल्या शहरात सुरू आहे तिथे टीमसोबत जाऊन मी अनेकवेळा प्रमोशन केले आहे. खरे तर हे प्रसिद्ध निर्मात्यांना शक्य होते. पण नवख्या निर्मात्यांना या सगळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
एकेकाळी आमचा भर हा माऊथ पब्लिसिटीवर असायचा. हिंदी चित्रपटांसारखे आजही मराठीत गणित झालेले नाही. हिंदी चित्रपट पहिल्या तीन दिवसात जोरदार व्यवसाय करतो. पण मराठीत तसे नसते. मराठीत चित्रपटाची चर्चा झाल्यानंतर लोक चित्रपटगृहाकडे वळतात. आज प्रमोशनमध्ये वाहिन्या महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. चित्रपटांचे प्रमोशन वाहिनींवरील रिअॅलिटी शो आणि मालिकांमध्ये केले जाते. तसेच एखादी वाहिनी संपूर्ण चित्रपट घेते. हे काही वर्षांपर्यंत नव्हते. पण आज वाहिनी चित्रपटाला पाठिंबा देत असल्यास त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांना एक पोषक वातावरण मिळते. वाहिन्या ज्याप्रकारे प्रमोशन करतात तसे प्रमोशन सामान्य निर्मात्यांना करणे शक्यच नाहीये. कारण त्यांचे तेवढे बजेटच नसते. या कारणाने चांगल्या चित्रपटाकडेदेखील प्रमोशनच्या अभावामुळे लोक दुर्लक्ष करत आहेत आणि अनेक चांगले चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत. पण प्रमोशनमध्ये कमी पडलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांनी साथ देणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या इंडस्ट्रीचा चांगला व्यवसाय होणार आहे. 
आज गेल्या काही महिन्यात खूपच कमी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही चिंतेची बाब आहे. खरे तर असे घडण्यामागे एक कारण आहे. पहिल्या चित्रपटाला अनुदान द्यायचे असे आपल्या सरकाने अनेक वर्षांपूर्वी ठरवले होते, त्याचवेळी हे आपल्या इंडस्ट्रीला घातक ठरेल असे मी त्या वेळेच्या सांस्कृतिक मंत्र्यांना भेटून सांगितले होते. पण त्यांनी त्यावर मला उत्तर दिले होते की, यासाठी एक कमिटी नेमण्यात येईल आणि ही कमिटी चित्रपट पाहून अ,ब,क ड अशी चित्रपटांची विभागणी करेन आणि त्यानुसार अनुदान दिले जाईल. पण यामुळे चित्रपट आणि निर्मात्यांची संख्या वाढेल आणि ते बॉक्स ऑफिसवर एकमेकांवर आदळतील असे मी त्यांना सांगितले होते. पण त्यांनी माझे ऐकले नाही आणि पुढे जाऊन ते खरेदेखील ठरले. गेल्या दोन वर्षांत एका शुक्रवारी चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होत होते. त्यामुळे कोणत्याच चित्रपटाला चांगला व्यवसाय करता येत नव्हता. यामुळे सगळ्याच निर्मात्यांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत आणि आता महिन्याला चारदेखील चित्रपट प्रदर्शित होत नाहीयेत. ठरावीक चित्रपट सोडले तर बाकी चित्रपटांचा खर्चदेखील वसूल होत नाहीये ही खरेच चिंतेची बाब आहे.
या सगळ्याचा त्रास चित्रपटसृष्टीला होत आहे आणि सगळे नुकसान निर्मात्यांना सहन करावे लागत आहे. नेहमीच कलाकारांच्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला जातो. पण कधीच निर्मांत्यांच्या समस्येचा विचार केला जात नाही. निर्मात्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यावर संपूर्ण पैसे दिल्यानंतरच कलाकार डबिंगला येतात. पण त्याचवेळी पैसे घेतल्यानंतर प्रमोशन करायला अनेकजण आढेवेढे घेतात. या सगळ्यात निर्माता पूर्णपणे खचून जातो. निर्मात्याची मेहनत ही चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या कित्येक दिवसांपासून सुरू असते. सुरुवातीला चित्रपटासाठी पैसा उभा करावा लागतो. त्यानंतर वेळेत  चित्रीकरण पूर्ण करावे लागते, चित्रपट पूर्ण झाला की सेन्सॉरच्या प्रमाणपत्रासाठी धावपळ करावी लागते. त्यानंतर चित्रपटगृह मिळणे, त्यातही चांगली वेळ मिळणे यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि एवढे करूनही अनेकवेळा त्यांच्या पदरी निराशाच येते. त्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही कालावधीनंतर सॅटलाइट हक्क विकले जातात यात निर्मात्याची कंबर अजूनच मोडते. कारण चित्रपट हिट झाला असेल तरच चांगला पैसा मिळतो. हिट न झालेला चित्रपटही चांगला असतो याचा वाहिन्यांनी विचार करणे खरे तर गरजेचे आहे. त्यातही सॅटलाइट हक्क घेतल्यानंतरही आम्हाला सांगितल्याप्रमाणे चित्रपटाचे प्रमोशन वगैरे अनेकवेळा केले जातच नाही. त्यामुळे एक निर्माता म्हणून सगळ्याच बाजूने आजकाल आमची कोंडी झाली आहे. 

Web Title: The Kanchan officials are telling the technique of promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.