Lock Upp: शो सुरु असतानाच या जोडीत वाढली जवळीकता; जुने गैरसमज झाले दूर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 13:10 IST2022-03-18T13:09:10+5:302022-03-18T13:10:12+5:30
Lock upp: काही दिवसांपूर्वीच या शोमध्ये सारा खानचा एक्स हसबंड अली मर्चेंट याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे सारा काही काळासाठी अस्वस्थ होती.

Lock Upp: शो सुरु असतानाच या जोडीत वाढली जवळीकता; जुने गैरसमज झाले दूर?
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत येणारी कंगना रणौत (kangana ranaut )सध्या तिच्या 'लॉक अप' (lock upp) या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच सुरु झालेल्या या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक दररोज नवनवीन खुलासे करत आहेत. तर, काही जोड्यांमध्ये प्रेमही खुलत आहे. यामध्येच या घरातील एक जोडीमधील अंतर कमी झालं असून त्यांच्यातील मतभेद दूर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच या शोमध्ये सारा खानचा एक्स हसबंड अली मर्चेंट याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे सारा काही काळासाठी अस्वस्थ होती. परंतु, आता हळूहळू तिने अलीशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर त्यांच्यातील मतभेददेखील दूर होताना दिसत आहे.
अलिकडेच ऑल्ट बालाजीने लॉक अपचा एक प्रोमो शेअर केला. या प्रोमोमध्ये सारा आणि अली एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत. "मी माझा भूतकाळ विसरुन जीवनात पुढे वळले आहे. पण तो टॅग ( लग्न आणि घटस्फोट) तेव्हापासून माझ्यासोबत आहे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि, मला या गोष्टीचा सतत त्रास होतो. मी आणि माझं कुटुंब या सगळ्या परिस्थितीचा सामना करुन वैतागलो आहोत. माझ्या वैयक्तिक जीवनातील अडचणींसह पुढे मार्गस्थ होणं माझ्यासाठी खरंच फार कठीण आहे", असं सारा म्हणाली.
"मी सुद्धा सेम परिस्थितीमधूनच जात आहे. सध्या आपण लॉक अपमध्ये आहोत. त्यामुळे सगळं विसरुन जा आणि नॉर्मल वाग. आपण एकमेकांशी रागात बोलतो. पण आपण इथे हे करायला आलेलो नाही", असं अली म्हणाला.
दरम्यान अली आणि सारा या दोघांनी बिग बॉस ४ मध्ये लग्न केलं होतं. २०१० मध्ये या जोडीने लग्न केलं. मात्र, अवघ्या दोन महिन्यांमध्ये ते विभक्त झाले. यावेळी साराने अलीवर अनेक गंभीर आरोप केले होते.