The Kapil Sharma show फेम अभिनेत्याने विष खाऊन केला आत्महत्येचा प्रयत्न; शेजाऱ्यांमुळे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 01:29 PM2022-01-06T13:29:49+5:302022-01-06T13:30:37+5:30
The kapil sharma show actor:
छोट्या पडद्यावरील 'द कपिल शर्मा शो' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधील एका अभिनेत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक तंगीमुळे कंटाळलेल्या या अभिनेत्याने विष खाऊन त्याचं जीवन संपवायचा प्रयत्न केला. परंतु, शेजाऱ्यांनी योग्यवेळी त्याला दवाखान्यात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. तीर्थानंद असं या अभिनेत्याचं नाव असून त्यांना नाना पाटेकर यांचा हमशक्ल असंही म्हटलं जातं.
'आज तक'च्या वृत्तानुसार, जवळपास १५ वर्षांपासून कलाविश्वात काम करणारे तीर्थानंद हे मागील दोन वर्षांपासून बेरोजगार आहेत. कोविड संकटामुळे काम मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे २७ डिसेंबर रोजी त्यांनी विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, शेजाऱ्यांनी योग्य वेळी दवाखान्यात त्यांना दाखल केल्यामुळे त्यांच्यावरील संकट टळलं. ४ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.
आर्थिक तंगी अन् कौटुंबिक वादामुळे उचललं टोकाचं पाऊल
"मी विष प्राशन केलं होतं आणि माझी प्रकृती गंभीरही होती. आर्थिक संकंट कोसळ्यामुळे माझ्या कुटुंबानेही माझी साथ सोडली. मी रुग्णालयात होतो पण माझी आई आणि भाऊ माझी विचारपूस करायला सुद्धा आले नाहीत. आम्ही एकाच कॉम्पलेक्समध्ये राहतो. आज १५ वर्ष झाले पण माझे कुटुंबीय माझ्याशी बोलत नाहीत.माझ्या उपचारांसाठीही त्यांनी आर्थिक मदत केली नाही", असं तीर्थानंद म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "माझ्यावर कर्ज आहे. रुग्णालयातून घरी आल्यावर सुद्धा मी एकटाच आहे. यापेक्षा एखाद्या जीवंत व्यक्तीसाठी दुसरं काय दु:खं असू शकतं. आजपर्यंत माझ्या आईने कधी मला जेवायलाही दिलं नाही. मला एक मुलगी आहे. पण, माझ्या पत्नीने दुसऱ्यासोबत संसार थाटला. आणि, माझ्या मुलीचंही लग्न झालंय.पण, तिच्यासोबत काहीच संपर्क नाही. मी काम आणि कुटुंब या सगळ्यामध्ये अडकून गेलोय. मला कळत नाहीये या सगळ्यातून कसा मार्ग काढू. एकीकडे हातात काम नाही. आणि, दुसरीकडे घरातील एकटेपण असह्य होतोय. त्यामुळे मी हे टोकाचं पाऊल उचललं."
दरम्यान, तीर्थानंद हे विरार येथे राहणारे असून जवळपास १५ वर्ष त्यांनी कलाविश्वात काम केलं आहे. हिंदीसह त्यांनी अन्य ८ भाषांमध्येही काम केलं आहे. इंडस्ट्रीमध्ये त्यांना नाना पाटेकर यांचा हमशक्ल म्हणून ओळखलं जातं.त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं असून द कपिल शर्मा शोमध्येदेखील विविध भूमिका साकारल्या आहेत.