KBC 11 : डॉक्टरांनी मृत समजून डस्टबिनमध्ये फेकले...! ‘तिची’ कहाणी ऐकून अमिताभही स्तब्ध!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 11:54 AM2019-08-23T11:54:16+5:302019-08-23T11:56:49+5:30
‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावणा-या नुपूर चौहान हिच्या कहाणीने महानायक अमिताभ बच्चनही स्तब्ध झालेत.
‘कौन बनेगा करोडपती’च्या 11 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून हजेरी लावणा-या नुपूर चौहान हिच्या कहाणीने खुद्द महानायक अमिताभ बच्चनही स्तब्ध झालेत. नुपूर हॉट सीटवर येताच केबीसीचा अख्खा मंच टाळ्यांच्या कडकडाटाने दणाणून गेला. अमिताभ स्वत: नुपूरला हॉटसीटपर्यंत घेऊन आलेत. हॉट सीटवर बसलेल्या नुपूरने आपली कहाणी ऐकवली आणि अनेकांचे डोळे पाणावले.
नुपूर ही एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. यामुळे ती सामान्यपणे चालू शकत नाही. पण याऊपरही आयुष्यात कधीही व्हीलचेअर घ्यायची नाही, ही तिची जिद्द होती. गुरुवारी अमिताभ यांनी फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा रिझल्ट ऐकवत विनरचे नाव जाहीर केले आणि नुपूर रडू लागली.
अमिताभ नुपूरच्या सीटपर्यंत आले, त्यांनी तिचे सांत्वन केले आणि तिला आपला हात दिला. नुपूर काहीशी लडखडत उठली आणि चालू लागली. पण चार पाऊले चालताच तिच्या भावाने नुपूरला अलगद कवेत घेतले आणि हॉटसीटपर्यंत पोहोचवले.
तू कधीही व्हीलचेअरचा वापर केला नाहीस असे का? असा पहिला प्रश्न अमिताभ यांनी नुपूरला केला. यावर‘ सर मी व्हीलचेअरवर बसलीतर पुन्हा कधीही उभी होऊ शकणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या पायावर उभी राहिल. मग कुणाच्या आधारे असो वा स्टँडच्या मदतीने. पण व्हीलचेअर वापरणार नाही, असे नुपूर म्हणाली.
नुपूरच्या आजच्या या स्थितीला डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, हे ऐकून तर अमिताभ स्तब्ध झाले. तिने सांगितले की, सर, मी पेशाने शिक्षक आहे. मी Mixed Cerebral Palsy या आजाराने ग्रस्त आहे. यात शरीराने एखादे अंग काम करत नाही वा काही मुलांची प्रगती संथ होते. मी नशिबवान आहे की, माझी बुद्धी, माझा मेंदू सामान्य आहे.
माझा जन्म सिझेरियनने झाला. जन्मावेळी मी रडले नाही, म्हणून मृत समजून डॉक्टरांनी मला डस्टबिनमध्ये फेकले. माझ्या आजी आणि मावशीने एका कर्मचा-याला पैसे देऊन मला डस्टबिनमधून बाहेर काढले. आजीने माझ्या पाठीवर थोपटले. माझा श्वास सुरु होईल, असे तिला वाटले. तिने माझ्या पाठीवर मारले आणि मी जोरात रडू लागले. ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याने मी जन्मत: रडले नव्हते. पण नंतर 12 तास सतत रडले. डॉक्टरांनी त्याही वेळी टिटनेस आणि ज्वॉइंडिस समजून मला चुकीचे इंजेक्शन दिले. डॉक्टरांच्या या चुकीची शिक्षा मी आज भोगतेय. नुपूरचे ते शब्द ऐकून अमिताभ स्तब्ध झाले. मी यावर काय बोलू. मी केवळ तुझ्या हिमतीची दाद देईल, असे ते म्हणाले.