KBC 11 : छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल अखेर अमिताभ यांनी मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 11:01 AM2019-11-09T11:01:04+5:302019-11-09T11:02:24+5:30
सोनी वाहिनीने माफी मागितल्यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी मात्र या प्रकरणात मौन बाळगले होते. पण आता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांची माफी मागितली आहे.
'कौन बनेगा करोडपती... कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी सोनी वाहिनी, अमिताभ बच्चन, कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यावर सोशल मीडियाद्वारे लोकांनी टिप्पणी केली होती. यासाठी सोनी वाहिनी आणि अमिताभ यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. तसेच सोनी वाहिनी, अमिताभ बच्चन, कार्यक्रमाचे दिग्दर्शक व निर्माता यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने पुण्यात केली होती. त्याकरता त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देण्यात आला होता. अनेकांनी सोशल मीडियावर मोहीमही उभारली होती. पण हे प्रकरण चांगलेच तापल्यानंतर सोनी वाहिनीने या प्रकरणावर माफी मागितली.
सोनी वाहिनीने माफी मागितल्यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी मात्र या प्रकरणात मौन बाळगले होते. पण आता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांची माफी मागितली आहे. त्यांनी नुकतेच ट्वीट करून त्यात लिहिले आहे की, कोणाचाही अपमान करायला माझा उद्देश नव्हता. माझ्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो.
No disrespect meant at all .. apologies if it has hurt sentiments .. 🙏 https://t.co/ynPav4DYfO
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 8, 2019
नुकत्याच प्रसारित झालेल्या कौन बनेगा करोडपतीच्या भागात 'इनमे से कोन से शासक मुगल सम्राट औरंगजेब के समकालीन थे'...? या प्रश्नावर चार पर्याय देण्यात आले होते. त्यात ए ) महाराणा प्रताप बी ) राणा सांगा सी ) महाराजा रणजीत सिंह डी ) शिवाजी असे पर्याय देण्यात आले होते. त्यात महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याने सोनी वाहिनी आणि अमिताभ बच्चन यांनी माफी मागावी अशी मागणी लोकांकडून करण्यात आली होती. सोशल मीडियावरील विरोध पाहता केबीसी मेकर्सनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात याबद्दल माफीचा स्क्रोल चालवला होता. तसेच सोनी टीव्हीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या पेजवरून याचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले होते की, 'बुधवारी केबीसीच्या एपिसोडमध्ये अनावधानाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आमच्याकडून एक चूक झाली होती. त्याबद्दल आम्हाला खेद आहे. लोकांच्या भावनांचा विचार करून आम्ही खेद व्यक्त करत एपिसोडमध्ये माफीचा स्क्रोल चालवला आहे.'