KBC मध्ये ५ कोटी रूपये जिंकणारा बिहारचा सुशील कुमार आता काय करतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 09:11 AM2020-11-20T09:11:20+5:302020-11-20T09:16:37+5:30
कौन बनेगा करोडपतीच्या पाचव्या सीझनमध्ये पहिल्यांदा बिहारच्या चम्पारण जिल्ह्यातील सुशील कुमारने ५ कोटी रूपये जिंकून इतिहास रचला होता.
KBC 12 मध्ये नुकत्याच दोन महिला स्पर्धक नाझिया नसीम आणि आयपीएस मोहिता शर्मा गर्ग यांनी एक-एक कोटी रूपये जिंकले. दोघींनीही ७ कोटी रूपयांच्या प्रश्नावर खेळ सोडला. पण याआधी कौन बनेगा करोडपतीच्या पाचव्या सीझनमध्ये पहिल्यांदा बिहारच्या चम्पारण जिल्ह्यातील सुशील कुमारने ५ कोटी रूपये जिंकून इतिहास रचला होता. तो केबीसीतील आतापर्यंतचा सर्वात जास्त रक्कम जिंकणारा स्पर्धक आहे.
सुशील कुमारने ५ कोटी रूपये २०११ मध्ये जिंकले होते. इन्कम टॅक्स कापून सुशील कुमारच्या खात्यात ३ कोटी ६० लाख रूपये जमा झाले होते. या पैशातून त्याने त्याचं वडिलोपार्जित घर ठीक केलं आणि भावांना उद्योग सुरू करून दिले. बाकी शिल्लक राहिलेले पैसे त्याने बॅंकेत जमा केले. पण आता सुशील कुमार काय करतो किंवा त्याच्याकडे किती रूपये शिल्लक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
अनेक उद्योगात नुकसान
सुशील कुमारने जवळपास २ महिन्यांपूर्वी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमधून त्याने सांगितले होते की, २०१५-१६ हे वर्ष त्याच्यासाठी फारच आव्हानात्मक होतं. त्याला समजत नव्हतं की, त्याने काय कराव. फेसबुक पोस्टमध्ये त्याने लिहिले की, केबीसी जिंकल्यानंतर तो एका सेलिब्रिटीप्रमाणे जगू लागला होता. लोक त्याला कार्यक्रमात बोलवत होते. यातून त्याचं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. त्याने सुरू केलेले अनेक बिझनेस बुडाले. ते दानही करू लागले होते. पण नंतर समजलं की, दान घेणारा व्यक्ती खोटारडा होता.
दारू आणि सिगारेटची सवय
पैसे आल्यावर त्याचे पत्नीसोबत भांडणं वाढले. यादरम्यान त्याची दिल्लीतील अनेक विद्यार्थ्यांसोबत मैत्री झाली. त्यांच्यासोबत राहून त्याला दारू आणि सिगारेटची सवय लागली. सिनेमे बघण्याची आवड होती. तर रोज एक सिनेमा बघत होता. त्यानंतर तो मुंबईत सिनेमाची स्क्रीप्ट, कथा आणि दिग्दर्शनात काम करू लागला. एका स्क्रीप्टचे त्याला २० हजार रूपये मिळायचे. एकाच घरात दिवस काढणं त्याला अवघड जात होतं. त्यामुळे दारूची सवय वाढली पण तेही जमलं नाही.
पर्यावरण जागृती आणि कविता लेखनाचं काम
यानंतर तो घरी परत गेला आणि तिथे शिक्षकाच्या परिक्षेची तयारी केली. त्यात तो पासही झाला. आता तो शिकवण्यासोबतच पर्यावरणाबाबत जनजागृती करतो. सोबतच स्क्रीप्ट आणि कविता लेखनही करतो. त्याने सांगितले की शेवटची तो २०१६ च्या मार्चमध्ये दारू प्यायला होता आणि २०१९ मध्ये त्याने सिगारेट ओढणं सोडलं. त्याच्या अलिकडच्या फेसबुक पोस्टवरून दिसतं की, सध्या तो वेगवेगळ्या उपक्रमांवर काम करतो.