50 लाखांसाठी बिग बींनी विचारला प्रश्न; तुम्हाला येतंय का याचं उत्तरं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 11:39 IST2022-08-09T11:39:25+5:302022-08-09T11:39:57+5:30
Kbc: दुलीचंद यांनी २५ लाखांपर्यंत प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तरं दिलं. मात्र, ५० लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देताना ते थोडे साशंक झाले होते.

50 लाखांसाठी बिग बींनी विचारला प्रश्न; तुम्हाला येतंय का याचं उत्तरं?
माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’(kbc 14). अलिकडेच सोनी टीव्हीवर या शोच्या १४ व्या पर्वाची सुरुवात झाली आहे. हे नवीन पर्व सुरु झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलं आहे. बुचकळ्यात टाकणारे प्रश्न आणि त्यासाठी मिळणारी मोठी रक्कम या शोची उत्सुकता कायम वाढवत असते. सध्या या शोमधील असाच एक प्रश्न चर्चिला जात आहे. ५० लाखांसाठी विचारलेल्या या प्रश्नासाठी स्पर्धकाने 50:50 लाइफलाइनची मदत घेतली. त्यामुळेच लाइफलाइनची मदत घ्यायची गरज पडलेला हा प्रश्न कोणता ते पाहुयात.
अलिकडेच या शोमध्ये दुलीचंद अग्रवाल हे हॉट सीटवर बसले होते. जवळपास २१ वर्ष या शोमध्ये येण्यासाठी दुलीचंद प्रयत्न करत होते. अखेर १४ व्या पर्वात त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं. दुलीचंद यांनी २५ लाखांपर्यंत प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तरं दिलं. मात्र, ५० लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देताना ते थोडे साशंक झाले होते. ज्यामुळे त्यांना लाइफलाइनचा आधार घ्यावा लागला.
काय होता ५० लाखांसाठीचा प्रश्न?
प्रश्न - १९५३ मध्ये भारतातील पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या देशात संसदीय निवडणूक झाली होती?
ऑप्शन - नेपाळ, अफगाणिस्तान, सुदान, साऊथ आफ्रिका
हा प्रश्न बिग बींनी (amitabh bachchan) दुलीचंद यांना विचारला होता. दुलीचंद यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर ठावूक होतं. मात्र, थोडेसे साशंक असल्यामुळे त्यांनी लाइफलाइनचा वापर केला आणि योग्य उत्तर दिलं. मात्र, यात त्यांना एक लाइफलाइन गमवावी लागली.
काय आहे योग्य उत्तरं?
या प्रश्नाचं योग्य उत्तरं सुदान असं आहे. भारताचे मुख्य निवडणूक अधिकारी सुकुमार सेन यांच्या अध्यक्षतेखाली सुदानमध्ये पहिलं मतदान पार पडलं होतं. भारतापासून प्रेरणा घेत सुदानमध्ये १९५७ मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्याचं सांगण्यात येतं.